बीड : स्ट्रीट फूडच्या (Street food) बाबतीत बीड देखील आता मागे राहिले नाही. पावसाळ्यात आपल्या वेगवेगळ्या गरमा-गरम पदार्थांचा आस्वाद घेण्याची इच्छा होते. बीडमध्ये काही असे स्ट्रीट फूड मिळतील जे पाहताच तुम्ही स्वतःला खाण्यापासून थांबवू शकणार नाही. त्यातील एक फेमस स्ट्रीट फूड म्हणजे पुरी भाजी (Puri bhaji). बीडकर या स्ट्रीट फूडचा आवडीने आस्वाद घेतात.
महाराष्ट्रातील प्रत्येक गाव-शहरात आपल्याला नवनवीन पदार्थ पहायला मिळतील. असे चटपटीत किंवा झणझणीत पदार्थाचे ठिकाण आपण शोधून तेथे जात असतो. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात मागील 23 वर्षापासून प्रसिद्ध अशी झणझणीत पुरी भाजी हॉटेल समाधानमध्ये मिळते. परिसरातील नागरिक येथील पुरी भाजी आवडीने खातात.
5 रुपये प्लेटपासून सुरूवात
नारायण चोरघडे यांनी 1999 साली बीड रोड माजलगाव येथे पुरी भाजीच्या हॉटेल व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला दिवसाकाठी एक किलो गव्हाची पुरी बनवली जायची. तेव्हा ही पुरी भाजी प्लेट पाच रुपयात मिळायची. आता या व्यवसायाला 23 वर्षे पूर्ण झाली आहेत. सुरुवातीला हा व्यवसाय चालेल का, असा प्रश्न होता. मात्र, खवय्यांनी येथील पुरी भाजीला जो प्रतिसाद दिला त्यामुळे हा व्यवसाय इतके वर्ष झाले तग धरून आहे.
दिवसाकाठी 200 ते 250 प्लेटची विक्री
इतक्या वर्षात महागाईमुळे पुरी भाजीच्या प्लेटची किंमत वाढली. मात्र, चव अगदी तशीच असल्याचे खवय्ये सांगतात. आता महागाईच्या काळामध्ये पुरी भाजीची प्लेट चाळीस रुपयांपर्यंत पोहोचली आहे. एका प्लेटमध्ये पाच पुऱ्या, एक प्लेट भजी, आणि दही आणि कांदा दिला जातो. समाधान हॉटेलमध्ये मिळणाऱ्या पुरी भाजीचे वेगळे असे वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी, बटाटे, गावरान मटकी, गावरान वटाने, व घरगुती मसाल्याचा वापर करून भाजी बनवली जाते. 200 ते 250 प्लेटची दिवसाकाठी विक्री देखील होते.
हेही वाचा- यमराजाला शापमुक्त करणारे आशापूरक मंदिर, पाहा VIDEO
झणकेबाज पुरी भाजी
मागील पंधरा वर्षापासून या हॉटेलात पुरी भाजी खात आहे. तेव्हा या पुरी भाजीची प्लेट पाच रुपयाला होती. आता चाळीस रुपयापर्यंत पोहोचली आहे. इतके वर्ष झाले परंतु चव तशीच आहे. येथील स्वादिष्ट चवीमुळं मी इथे येतो. जिल्ह्यात अशी झणकेबाज पुरी भाजी मला तरी खावयास मिळाली नसल्याचे खवय्ये आत्मलिंग खुरपे यांनी सांगितले.
हेही वाचा- निसर्गरम्य वातावरणात घ्या झटका मिसळचा आस्वाद, पाहा VIDEO
23 वर्षांपासून तीच चव
1999 साली या व्यवसायाला सुरुवात केली. त्यावेळी 10 ते 20 प्लेट पुरी भाजीची विक्री व्हायची. आता 200 ते 250 प्लेटची दिवसाकाठी विक्री होते. सकाळी पाच वाजता सर्व पदार्थ बनवण्यास सुरुवात होते. सात वाजल्यापासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत खवय्यांची या ठिकाणी मोठी गर्दी होते. 23 वर्षांमध्ये आम्ही कधीच हलक्या स्वरूपाचे पदार्थ वापरले नाहीत, त्यामुळेच ती चव आजही मिळत असल्याचे समाधान हाॅटेलचे मालक नारायण चोरघडे (संपर्क क्रमांक- 8485825777) यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Beed news, Food, Local18, Local18 food