बीड, 20 डिसेंबर : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. ठिकठिकाणाहून निर्णय समोर येत आहे. एरवी बीडमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यामध्ये राजकीय वाद पाहण्यास मिळतो. पण, परळी तालुक्यातील मूळ गाव नाथरा गावात दोघांनी एकत्र येऊन सरपंचपदाचा उमेदवार निवडून आणला आहे.
बीड जिल्ह्यातील मतदारसंघात मुंडे बहीण भावाची प्रतिष्ठापणाला लागलेल्या ग्रामपंचायतीमधील प्राथमिक निकाल हाती आले. नाथ्रा ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. नाथ्रा गावामध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी पाठिंबा दिलेला उमेदवार विजयी झाला आहे.
(gram panchayat : भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष,राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर)
'नाथ्रा ग्रामपंचायत ही मी आणि धनंजय मुंडे यांनी मिळून बिनविरोध काढली होती. गावच्या लोकांची इच्छा अशी होती की ग्रामपंचायत बिनविरोध निघाली पाहिजे. त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला. उपसरपंच आमचा राहील आणि सरपंच राष्ट्रवादीचा राहील असा निर्णय झाला होता. मात्र धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनीच ऐकलं नाही म्हणून निवडणूक लागली या निवडणुकीचा विजय अगोदरच झाला होता, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.
(चंद्रकांत पाटलांनी जिथे केला प्रचार तिथे भाजप उमेदवार पडला!)
नाथ्रा गावामध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे एकाच बॅनर वरती फोटो होते. त्यामुळे या दोघांचा उमेदवार असलेला अजय मुंडे यांचा 648 मतांनी विजय झाला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा सरपंच तर भाजपचा उपसरपंच होणार आहे, अशी मुंडे बहीण भावांनी वाटाघाटी करून ही निवडणूक लढवली असल्याने राज्यात चर्चेचा विषय ठरला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.