बीड, 6 फेब्रवारी : राज्यात आर्थिक फसणुकीच्या प्रकारात वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यात आता बीड जिल्ह्यातही एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीड जिल्ह्यात बजाज विमा कंपनी शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचं पाहायला मिळते आहे. कंपनीची चूक असताना याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना दिला जात असल्याचे समोर आले आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावर साडेबारा कोटी रुपये जमा झाल्यानंतर कंपनीने जवळपास 12 हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांची खाती गोठवली आहेत. जवळपास गेल्या 1 महिन्यांपासून अनेक शेतकऱ्यांचे खाते गोठवले गेले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना ऐन कामाच्या वेळेला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.
बजाज अलियान्झ कंपनीने चुकून अतिरिक्त 12 कोटी 35 लाख 13 हजार 358 रुपयांची रक्कम 12 हजार 883 शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा केल्याचा दावा केला आहे. पैसे जमा झालेल्या खासगी, सहकारी आणि राष्ट्रीयीकृत बँकांमधील शेतकऱ्यांची बँक खाती कंपनीच्या सूचनेनुसार गेल्या महिनाभरापासून गोठवण्यात आली आहेत. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार ठप्प आहेत, असा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, ही कंपनीची चूक असताना त्याचा त्रास मात्र शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
कंपनीने काय म्हटले -
तर या संपूर्ण प्रकारावर कंपनीने म्हटले आहे की, चुकीने पैसे ट्रान्सफर झाले आहेत. त्यामुळे दुसऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना पैसे द्यायचे आहेत म्हणून रिकव्हरी करत आहोत, त्यासाठी ही खाती गोठवण्यात आली आहेत, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. तर येत्या 48 तासांत हे प्रकरण सोडवावे, असे आदेश जिल्हाधिकारी राधाबिनव शर्मा यांनी कंपनीला दिले आहेत.
हेही वाचा - पुणे : व्याजाने घेतलेले पैसे परत केले, तरीही मारहाण करुन पैशांची मागणी, कंटाळून टोकाचं पाऊल
पुण्यात आर्थिक फसवणुकीचे प्रकार थांबेना -
रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी बनावट नियुक्तीपत्र देऊन सुमारे 11 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. रेल्वे मेल सर्व्हिस विभागाचे (आरएमएस) बनावट नियुक्तपत्र देऊन लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. याप्रकरणी बंड गार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर याप्रकरणी बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.