मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मराठवाडा मुक्ती दिन : रझाकार कधीही दार वाजवत... 'वीर' पत्नीनं सांगितला थरारक अनुभव Video

मराठवाडा मुक्ती दिन : रझाकार कधीही दार वाजवत... 'वीर' पत्नीनं सांगितला थरारक अनुभव Video

स्वतंत्र भारतात विलीन होण्यास रझाकारांनी नकार दिला होता. परंतु, मराठवाड्यातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी लढा उभारत रजाकारांना झुकवले.

बीड, 16 सप्टेंबर :  इंग्रजाच्या गुलामीतून भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले. फाळणी मान्य करत असताना भारतातील शेकडो संस्थाने बरखास्त करण्यात आली. मात्र, याला अपवाद हैदराबादचे निजाम संस्थान होते. या संस्थानात मराठवाड्याचा देखील समावेश होता. स्वतंत्र भारतात विलीन होण्यास रझाकारांनी नकार दिला होता. परंतु, मराठवाड्यातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी लढा उभारत रजाकारांना झुकवले. या लढ्यात बाबुराव शिंदेंचा मोठा वाटा होता.  निजाम सरकारविरोधात लढा उभारण्यात बीडच्या स्वातंत्र्यसैनिकांची भूमिका संपूर्ण मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात उल्लेखनीय राहिली आहे. 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले खरे पण मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले नव्हते. भारतीय स्वातंत्र्याचा लढा तीन टप्प्यांमध्ये आहे. मराठवाड्यासह कर्नाटक, आंध्रातील काही जिल्हे निजामांच्या ताब्यात होती. मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळणे गरजेचे होते. यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकाने आपला लढा दिला. 16 व्या वर्षापासूनच लढ्यात सहभाग बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील बाबुराव लक्ष्मण शिंदे यांनी देखील मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त व्हावा यासाठी योगदान दिले. 1927 रोजी त्यांचा शिरूर कासार तालुक्यातील हनुमंत वाडी या गावी जन्म झाला. निजामांचा होत असलेल्या अत्याचार त्यांना सहन होत नव्हता. वयाच्या 16 व्या वर्षापासूनच बाबुराव शिंदे यांनी स्वातंत्र लढ्याच्या चळवळीत भाग घेतला.  कारावासही भोगला..  2006 रोजी शिंदे यांचे निधन झाले. मात्र, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त त्यांची पत्नी सत्यभामा शिंदे यांनी त्यांच्या आठवणीला उजाळा दिला. सत्यभामा सांगतात की, घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. मजुरी करून पोट भरावे लागत होते. मी मजुरी करत होती तर बाबुराव हे निजामाच्या तावडीतून मराठवाडा कसा मुक्त होईल, यासाठी चळवळीत दिवसरात्र काम करत होते. स्वातंत्र्याचा लढा देताना बाबुराव यांना 1948 मध्ये नगर जिल्ह्यातील इस्लामपूर जेलमध्ये काही दिवस राहावे लागले.  18 ते 20 लोकांचा ग्रुप बाबुराव दिवसभर चळवळीच्या कामात असायचे. रात्री घरी उशिरा येऊन देखील त्यांच्या डोक्यात स्वातंत्र्याचे वेड होते. त्यांच्यासोबत काही सहकारी काम करत असत. 18 ते 20 लोकांचा त्यांचा ग्रुप होता. बाबुराव यांनी दारुगोळा बनवण्याचे प्रशिक्षण देखील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये घेतले होते. महात्मा गांधी यांनी उभारलेल्या चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता.  रझाकार कधीही दार वाजवत... निजाम राजवटीतील अधिकारी घराची झडती घेत असत. रात्री बेरात्री देखील झडती घेऊन त्रास दिला जात होता. मात्र, मराठवाडा मुक्त व्हावा, यासाठी बाबुरावसारख्या अनेक नागरिकांनी खंबीर लढा देत निजामाच्या राजवटीतून मराठवाडा मुक्त केला.
First published:

Tags: Beed, Beed news, Marathwada

पुढील बातम्या