बीड, 2 फेब्रुवारी, सुरेश जाधव : बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाची हत्या केली. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. झोपेत असलेल्या बापाच्या डोक्यात लोखंडी खोरं घालून मुलानं बापाची हत्या केली. माजलगाव तालुक्यातील टाकरवन येथील ही घटना आहे. आरोपी मुलाला माजलगाव ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मारोती लक्ष्मण भुंबे (वय 55) असे मृत वडिलांचे नाव आहे. तर बाळू उर्फ लक्ष्मण मारोती भुंबे (वय 31) असं आरोपी मुलाचं नाव आहे.
डोक्यात लोखंडी खोऱ्याने प्रहार
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मारोती लक्ष्मण भुंबे घरात झोपले असताना पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास आरोपीने अचानक त्यांच्या डोक्यात लोखंडी खोऱ्याने अनेक प्रहार केले. आवाज होताच नातेवाईकांनी मुलाच्या तावडीतून मारोती भुंबे यांची सुटका केली. या घटनेमध्ये मारोती भुंबे हे गंभीर जखमी झाले होते. घरचे त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्याच्या तयारीमध्ये असतानाच आरोपी मुलाने पुन्हा एकदा त्यांच्या डोक्यात खोऱ्याने प्रहार केला. या हल्ल्यात मारोती यांचा जागीच मृत्यू झाला.
हत्येचं कारण अस्पष्ट
आरोपीने मारोती भुंबे यांच्या डोक्यात लोखंडी खोऱ्याने प्रहार करत त्यांची हत्या केली. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र मुलानेच मारोती भुंबे यांची हत्या का केली? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.