'आम्ही कोरोनातच का नाही मेलो', महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचं भयाण वास्तव समोर

'आम्ही कोरोनातच का नाही मेलो', महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचं भयाण वास्तव समोर

पाण्याची सोय नाही, लहान लहान लेकरांना मारायचं ठरवलं का? असा प्रश्न हे ऊसतोड मजूर विचारत आहेत.

  • Share this:

बीड, 28 एप्रिल : रोगापेक्षा इलाज भयंकर, असं म्हणण्याची वेळ ऊसतोड मजुरांवर आली आहे. कारण क्वारन्टाइन केलेल्या ऊसतोड मजुरांच्या मरण यातना पाहिल्या तर कोणत्याही संवेदनशील माणसाचे डोळे ओले होतील, अशी स्थिती आहे. प्रचंड उन्हात ऊसतोड मजुरांवर क्वारन्टाइन होण्याची वेळ आली. ना पाणी, ना लाईट, स्वछताग्रह तर दूर.. डोक्यावर साधं छप्पर पण नाही. जवळचं खाण्यापिण्याचं होतं ते सर्व काही संपलं. आता खायचं काय? हा प्रश्न ऊसतोड मजुरांसमोर आहे.

परवड आणि संघर्ष ऊसतोड मजुराच्या पाचवीला पुजलेला आहे की काय? तो थांबायचं नावच घेत नाही. लॉकडाऊनच्या कालावधीत कारखान्यावर अडकून पडलेला ऊसतोड मजुरांना स्वगृही आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र गावी आल्यानंतर त्यांचे संकट कमी होण्यापेक्षा वाढलं आहे. गावात लोक घेत नाहीत, गावापासून दूर अंतरावर डोंगराळ भागात निर्मनुष्य ठिकाणी राहावं लागतं.

प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आजतागायत बीड जिल्हयात 35 हजार ऊसतोड मजूर परतले आहेत, त्यांना 28 दिवस होम कॉरटाईन राहावं लागणार आहे. मात्र इथं जगायचं कसं? आम्ही आजाराने मेलेलो बरे, असं म्हणायची वेळ या मजुरांवर आली आहे.

बीड तालुक्यातील पेडगाव,कामखेडा,दगडी शाहजहानपूर येथील 10 ते 20 ऊसतोड मजूर कुटुंब त्यांच्या गावापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगराळ माळरानावर टेंबी येथे थांबले आहेत. त्यांना याठिकाणी शासनाकडून कुठली मूलभूत व्यवस्था करण्यात आली नाही, असे हे ऊसतोड मजूर सांगत आहेत. चक्क तीन किलोमीटर उन्हात पायी जाऊन पाणी आणावं लागतं असं या महिला सांगत आहेत. तर जेवणाची मोठी पंचाईत झाली आहे. जवळची शिदोरी होती ती कारखान्यावर संपली. इथे आल्यानंतर रेशन मिळेल मात्र अद्याप या कुटुंबांना रेशन नाही मिळाले नाही. लहान मुलांना कसं जगवायचं हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर आहे.

'व्यवस्था करू म्हटले, पण काही व्यवस्था, कारखान्यावरच बरं होत इथं जास्त हाल होत आहेत पाणी नाही, काम नाही, कारखान्यावरचे आणलेले पैशे संपले. आत्ता खायला काहीच नाही, उपाशी मारतंय का सरकार? काही तरी द्या ! पाण्याची सोय नाही, लहान लहान लेकराला मारायचं ठरवलं का? कोरोनामध्ये मेले असतो तर बरं झालं असतं. इथं गावातले म्हणतेत गावात येऊ नका इथं काय खायचं?' असा प्रश्न वैतागलेल्या ऊसतोड मजूर जयश्री माळी या करत आहेत.

ही वाचा - चीनच्या वुहानमध्ये आढळलेला कोरोनाचा 'तो' घातक प्रकार भारतात, या 2 राज्यांना केलं टार्गेट?

बीड जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या बाबतीत इथल्या प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन त्यांना जीवनावश्यक वस्तू व रेशन पुरवणे गरजेचे आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते अशोक लोढा यांनी व्यक्त केले. शासन एकीकडे कागदोपत्री ऊसतोड मजुरांना आणि क्वारन्टाइन केलेल्या व्यक्तींना सर्व सुविधा पुरवत असल्याचे सांगत आहे. मात्र बीड जिल्ह्यातील कामखेडा गावाजवळील हे वास्तव डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे.

या डोंगरात राहणारी दहा कुटुंबावर पाण्यावाचून आणि अन्नावाचून ताडफडण्याची वेळ आली. यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कुठलाही अधिकारी साधा फिरकलासुद्धा नाही. 45 डिग्री सेल्सिअसच्या तापमानात सावलीसुद्धा नसलेला ठिकाणी छोट्या छोट्या झोपडयाचा आधार घेतला आहे. यात या संकटात होरपळून निघणारे लहान लहान चिमुकली मुले यांच्या बाबतीत तरी आता प्रशासन विचार करणार आहे का, असाच प्रश्न निर्माण होत आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: April 28, 2020, 12:54 PM IST

ताज्या बातम्या