बीड, 10 जून: भाच्याला आणि मुलाला वाचवण्यासाठी मामाने धाव घेतली. मात्र, बापलेकासह भाच्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू (uncle, nephew and child drown) झाल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात (Beed district) घडली आहे. गेवराई तालुक्यातील दैठण गावात (Daithan village Gevrai) आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुनिल पंडित, पार्थ पंडित (वय -12) आणि भाचा आदित्य गोरख पाटील (वय- 9) अशी मृतकांची नावे आहेत. या घटनेने पंडित परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गेवराई तालुक्यातील दैठण येथील सुनिल जगन्नाथ पंडित यांनी स्वतःच्या मालकीच्या शेतात शेततळे आहे. या शेततळ्यात सुनिल पंडित, मुलगा पार्थ आणि भाचा आदित्य हे तिघेजण पोहायला गेले होते. त्यांचा एक छोटा मुलगा आणि त्यांची आई तळ्यावरती उभे होते. सुरूवातीला दोन्ही मुले पोहण्यासाठी तळ्यात पोहू लागले. मात्र, काही वेळात त्यांना दम लागल्याने ते दोघेही पाण्यात बुडू लागले. तेव्हा सुनिल पंडित यांनी पाण्यात उडी मारली. मात्र त्यांना शेत तळ्यातून बाहेर येता येईना. त्यांच्या आईने वाचवण्यासाठी ठिबकचा पाईप फेकला. त्याला धरून सुनिल यांनी मुलांसह वरती येण्याचा प्रयत्न केला. परंतू नळी तुटल्याने पुन्हा तिघेही पाण्यात पडले. बाहेर निघता न आल्याने तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
शेततळ्यात पडून 2 बालकांचा मृत्यू; सांगलीतील हृदयद्रावक घटना
वडील, भाऊ, मामे भाऊ बुडत असल्याचे दिसल्याने त्याने जवळच्या वस्तीवर पळत जाऊन घटना सांगितली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. आई आणि चिमुकल्या मुलाने केलेले प्रयत्न दुर्दैवाने निष्फळ ठरले. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
8 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू
गेवराई तालुक्यातील महिनाभरातील पाण्यात बुडून अपघात झालेली ही ही तिसरी घटना असून यासह आतापर्यंत 8 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये मागील महिन्यात 9 मे रोजी संगम जळगाव येथे मायलेकराचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. तसेच गेल्याच आठवड्यात 2 जून रोजी मिरगाव येथील गोदापात्रात बुडून तिघींचा मृत्यू झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed