बीड, 19 एप्रिल : एखाद्या सिनेमालाही लाजवेल अशी घटना बीडमध्ये (beed) उघडकीस आली आहे. राष्ट्रीय महामार्ग मांजरसुंबा-केज-अंबेजोगाई या रस्त्यावर चालत्या वाहनावर चढून चोरी करणाऱ्या दोघां संशयितांना पाठलाग करून पकडण्यात बीड पोलिसांना (beed police) यश आले आहे. मात्र एक जण फरार झाला आहे. मागील काही दिवसांपासून या चोरांच्या टोळीने मोठ्याप्रमाणात धुमाकूळ घातला होता. त्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं होतं. दोन चोरट्यांना जेरबंद केल्याने या रस्त्यावरील चोरीच्या घटनांना आळा बसेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मागील अनेक दिवसांपासून केज तालुक्यातील शिंदी फाटा ते कोरेगाव दरम्यान चालत्या वाहनावर चढून धारदार शस्त्राने ताडपत्री फाडून विविध वस्तू चोरीच्या घटना घडत आहेत. याची दखल घेऊन केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्यापथकाने पहाटे 5 वाजल्यापासून चोरांना पकडण्यासाठी दरम्यान दबा धरून बसले होते. सकाळी 6 वाजेच्या दरम्यान पोलीस पथक चोरट्यांचा शोध घेत असताना केज-बीड महामार्गावर सावंतवाडी पाटीजवळ असलेल्या टोल नाक्यावर तीन जण दबा धरून बसलेले संशयितरित्या आढळून आले.
पोलिसांना पाहताच ते तिघे पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीस पथकाने फिल्मी स्टाईलने पाठलाग केला. त्यात महादेव कल्याण पवार , सुंदर चंदर पवार या दोघांना ताब्यात घेतले तर बबन कल्याण पवार हा पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलीस नाईक दिलीप गित्ते यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. १२६/२०२२ भा. दं. वि. ४०१ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चालत्या वाहनातून चोरीसाठी घालायचे 5 पॅन्ट
चोरी करताना जर चालत्या गाडीतून खाली पडले तर लागू नये म्हणून चार ते पाच पॅन्ट आणि त्याच्या मागील बाजूस टायरचे रबर गुंडाळून ही टोळी चोरी करत होती. ताडपत्री फाडण्यासाठीची धारदार सुरी,कत्ती त्याचा वापर करायचे. या दोघांकडून पोलिसांनी चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले असून दोघांची रवानगी आता जेलमध्ये केली आहे तर तिसरा आता शोध सुरू आहे. या अगोदर या रस्त्यावर किती मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांना लुटले आहे, याचा देखील आकडा पोलीस तपासातून समोर येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.