बीड, 30 नोव्हेंबर : आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मराठा आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेतली जात असतानाच आता ओबीसी नेत्यांनीही राज्य सरकारमधील मंत्र्यांना इशारा दिला आहे. 'ओबीसी आरक्षणाला धक्का लावला तर मंत्र्याच्या गाड्या पेटवून देऊ,' असा इशारा जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी दिला आहे. सानप हे आज बीडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
'मराठा समाजाने आरक्षणासंदर्भात मोर्चे काढले असता आम्ही त्यांच्या सोबत होतो. मात्र मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणे गरजेचे आहे. ओबीसीमध्ये अगोदरच अनेक जाती असल्या कारणाने त्यात आरक्षण पुरत नाही, ओबीसीमध्ये मारामारी सुरू आहे,' असंही बाळासाहेब सानप म्हणाले.
'ओबीसी नेत्यांनी शेपूट घालून बसू नये'
आरक्षणप्रश्नी बोलत असताना बाळासाहेब सानप यांनी राज्यातील ओबीसी नेत्यांनाही खडेबोल सुनावले आहेत. 'मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देऊ नये. ओबीसी आरक्षणासंदर्भात मागणी सुरू असताना ओबीसी नेत्यांनी शेपूट घालून बसू नये. जर असं केलं किंवा ओबीसीचे मंत्री जर गप्प बसत असतील सुरुवातीला या मंत्र्यांना राज्यांमध्ये फिरु दिल जाणार नाही. जर मंत्र्यांनी त्यांचे बळ वापरण्याचा प्रयत्न केला तर मंत्र्यांच्या गाड्या पेटवू,' असा इशारा देखील सानप यांनी दिला आहे.