बीड, 10 जून : बीडच्या (Beed) गेवराईमध्ये (Gevrai) शेतीच्या वादातून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली. या हाणामारी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गेवराई तालुक्यातील लुखामसला गावात शेत जमिनीच्या बांधावरुन भांडण झाले. या किरकोळ भांडणाचे रुपांतर तुफान हाणामारी झाले. यात तिघे जण जखमी आहेत.
गेवराई तालुक्यातील लुखामसला शिवारात गट नं.16 मध्ये सविताबाई थोरात यांची जमीन असून या रस्त्यावरून सविताबाई थोरात व त्यांची दोन मुले अनुराज थोरात, केशव थोरात यांनी शेतात ऊस लागवडीसाठी ट्रॅक्टरमधून बेणे नेले. दरम्यान तुम्ही रस्त्यावरून ट्रॅक्टर का नेला, या कारणावरून शुभम वसंत व्हरकटे, वसंत व्हरकटे, नंदकुमार अंकुश सरगर, रावसाहेब दगडूबा व्हरकटे, करण वसंत व्हरकटे, रेखा वसंत व्हरकटे, दिव्या वसंत व्हरकटे यांनी वाद घातला.
यानंतर संगनमत करुन काठी कुऱ्हाडीने थोरात बंधूंसह त्यांच्या आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये अनुराज याला डोक्यात कुऱ्हाडीचा गंभीर घाव लागल्याने तो रक्तबंबाळ झाला. तर आई सविताबाई व केशव यांना देखील काठीने जबर मारहाण करण्यात आल्याने ते देखील जखमी झाले. जखमी तिघांनाही गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करुन अनुराज याला गंभीर मार लागल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ज्येष्ठ नागरिकांना मिळेल मोठा फायदा, 30 जूनपर्यंत या बँका देतायंत चांगली संधी
जखमींनी पोलीस ठाणे गाठून वरील आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र ठाणे अंमलदार व बीट अंमलदार देशमुख यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने जखमींनी ठाण्यात ठिय्या मांडला. यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र पेलगुरवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी तुमच्यावर अन्याय होणार नाही, आरोपींवर योग्य कारवाई करण्यात येईल. तुम्ही अगोदर उपचार घ्या, जिल्हा रुग्णालयात जबाब घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना तात्काळ पाठविण्यात येईलस असे आश्वासन दिल्यानंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. दरम्यान, यापूर्वी देखील आरोपींनी आम्हाला मारहाण केली होती, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.