बीड, 21 मे: संपूर्ण देश आज कोरोनाशी लढा देत आहे. या लढाईत कोरोना रुग्णांना आधार देण्याचा प्रयत्न त्यांचे नातेवाईक-डॉक्टर करतात. मात्र काही घटना या एकंदरितच संपूर्ण लढ्याला गालबोट लावणाऱ्या ठरत आहेत. बीडमधून (Beed) देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर येते आहे. कोरोनाची लागण झालेल्या एका रुग्णाने आत्महत्या (Corona Patient Committed Suicide in the Hospital) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हॉस्पिटलमध्येच या रुग्णाने त्याचं जीवन संपवलं. अवघ्या 35 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याने त्याचे कुटुंबीय आणि गावकरी पुरते हादरून गेले आहेत. दरम्यान मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी न्यायाची मागणी करत त्याचा मृतदेह घेण्यास नकार दिला आहे. यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्या करतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामुळे हॉस्पिटल प्रशासन काय झोपलं होतं का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बीड शहरातील नामांकित दिप हॉस्पिटलमध्ये ही धक्कादायक घटना घडली. आत्महत्या केलेला तरुण ऊसतोड मजूर अजून त्याचं नाव रामलिंग महादेव सानप असं होतं. हॉस्पिटल व्यवस्थापन बिलासंदर्भात रुग्णाला वारंवार विचारणा करत होते, त्यामुळेच माझ्या पतीने आत्महत्या केल्याचा आरोप मयत रामलिंग याच्या पत्नीने केला आहे. दरम्यान हॉस्पिटल प्रशासनाने नातेवाईकांचे सर्व आरोप फेटाळले आहेत.
#Beed खळबळजनक! रुग्णालयातच कोरोना रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद pic.twitter.com/ll9pRxr6mh
— News18Lokmat (@News18lokmat) May 21, 2021
रामलिंग सानप यांनी आत्महत्या करतानाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यामुळे ही घटना घडत असताना हॉस्पिटलमधील कर्मचारी, डॉक्टर काय करत होते असा प्रश्न उपस्थित होत आहे. सीसीटीव्ही दृश्यांकडे कुणाचच लक्ष नव्हतं का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या घटनेनंतर खाजगी हॉस्पिटलमधील बेजबाबदारपणा समोर येत असल्याचा आरोप केला जात आहे. या रुग्णालयावर कारवाई केली जावी अशी मागणी नातेवाईक करत आहेत. नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर ठिय्या मांडला असून डॉक्टरांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed news