बीड, 11 एप्रिल : जिल्ह्यात (Beed) कोरोना (Corona) बाधितांचे आकडे दिवसेंदिवस वाढतच आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर मृत्यू होणाऱ्यांच्या आकड्यातही त्यामुळं मोठी वाढ होत आहे. सगळीकडंच कोरोनचा प्रसार होत असताना आता बीडच्या जिल्हा कारागृहातही (Beed District Jail) कोरोनानं शिरकाव केला आहे. याठिकाणी 28 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं तुरुंग प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.
वाचा - विदारक दृश्यांची पुनरावृत्ती! मिळेल त्या मार्गाने घरी पोहोचण्यासाठी धडपड
बीड जिल्हा कारागृहामध्ये 161 कैद्यांची क्षमता आहे. पण या कारागृहात प्रत्यक्षात 297 कैदी आहेत. क्षमतेपेक्षा जवळपास दुप्पट कैदी याठिकाणी असल्यामुळं कारागृहात कैद्यांना जागा अपुरी पडत आहे. त्यामुळं कैद्यांमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव पसरल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कारागृहातील 28 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता इतरही कैद्यांना याचा संसर्ग झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसं झाल्यास प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
वाचा - लग्नाआधीच नवरदेवाला कोरोना, तरीही वरात पोहोचली नवरीच्या दारात; 'असा' झाला विवाह
कोरोनाची लागण झालेल्या कैद्यांमुळे कारागृहातील इतर कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्या उपचारासाठी किंवा विलगीकरणासाठी सोय करण्याच प्रश्न प्रशासनासमोर आहे. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहासाठीची इमारत कोरोनाबाधित कैद्यांसाठी देण्याची मागणी प्रशासनानं जिल्हाधिकाऱ्यांकडं केली आहे. मात्र, अद्याप त्याला मंजुरी मिळाली नसल्यानं काय करायचं असा प्रश्न तुरुंग प्रशासनासमोर उभा राहिला आहे.
कैद्यांची काळजी घेतली जात असून लवकरच पर्यायी व्यवस्था करत असल्याचं जिल्हा कारागृह अधीक्षकांनी म्हटलंय. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये संसर्गाचं प्रमाण वाढल्यानंतर आणि काही ठिकाणी तुरुंगात कैद्यांना लागण झाल्यानंतर सौम्य गुन्ह्यातील आरोपींना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता यावेळी पुन्हा एकदा संसर्गाचं प्रमाण वाढल्यामुळे राज्य सरकार असे निर्देश देणार का हे पाहावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed news, Coronavirus, Prisoners