Home /News /maharashtra /

बीडमध्ये पुन्हा उफाळला राजकीय संघर्ष, क्षीरसागर काका-पुतण्या आले आमने-सामने

बीडमध्ये पुन्हा उफाळला राजकीय संघर्ष, क्षीरसागर काका-पुतण्या आले आमने-सामने

बीड नगरपालिकेच्या निवडणुकीमधूनच काका-पुतण्याच्या संघर्षाची पहिल्यांदा ठिणगी पडली होती.

बीड, 16 सप्टेंबर : राज्याच्या राजकारणातील मातब्बर क्षीरसागर कुटुंबातील काका पुतण्या संघर्ष काही नवा नाही. निवडणुकांच्या रणांगणानंतर नव्याने हाच काका-पुतण्या संघर्ष आता विकास कामावरुन बीड शहरामध्ये पेटला आहे. बीड शहरातील पिंपळगव्हाण सिमेंट रस्ता बनवण्याचे काम सुरू आहे. यावरूनच राजकीय संघर्ष उफाळून आला असून वातावरण तापलं आहे. शिवसेनेचे नगराध्यक्ष डॉ .भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडून हे काम केले जात असताना आमदार संदीप क्षीरसागर यांच्या 'काकू नाना विकास आघाडी'च्या नगरसेवकांनी या रस्त्याचे काम अडवून गुत्तेदाराला दमदाटी करत काम बंद पाडले असल्याची तक्रार शिवसेनेचे नगरअध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी केली आहे. तर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे राष्ट्रवादीच्या (काकू नाना विकास आघाडीच्या) नगरसेवका कडून सांगण्यात येत आहे. यावरूनच आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आमदार संदीप क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ भारत भूषण क्षीरसागर काका-पुतणे आमने सामने आले. यामुळे बीड शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बीड नगरपालिकेच्या निवडणुकीमधूनच काका-पुतण्याच्या संघर्षाची पहिल्यांदा ठिणगी पडली होती. यामध्ये पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी काकू नाना विकास आघाडीची स्थापना करत काका नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या विरोधात पॅनल उभा केला होता. यामध्ये लोकमतातून नगराध्यक्ष निवडीमुळे काका डॉ भारतभूषन क्षीरसागर हे नगराध्यक्ष झाले, तर यात संख्याबळाच्या तुलनेत नगरसेवक जास्त निवडून आल्याने पुतण्या संदीप क्षीरसागर यांचे लहान बंधू हेमंत क्षीरसागर हे उपनगराध्यक्ष झाले. तेव्हापासून आजपर्यंत नगरपालिकेच्या विकास कामावरून सतत दोन्ही गटांमध्ये वादावादी सुरू आहे. पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीत काका विरुद्ध पुतण्या आमने-सामने आल्यानंतर पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी शिवसेनेचे नेते जयदत्त क्षीरसागर यांना पराभूत केले. तेव्हापासून राजकीय मैदानातील वाद शमला होता. मात्र पुन्हा एकदा नगरपालिकेमधील विकासकामांच्या आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. बीड जिल्ह्यामध्ये शहरातील रस्त्याच्या कामावरून पुन्हा एकदा काका-पुतणे हे समोरासमोर आले आहेत. यामुळे बीड शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने हा वाद मिटला असला तरी संघर्ष पुन्हा धुमसण्याची भीती वर्तवली जात आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Beed

पुढील बातम्या