बीड, 16 मे : बीड जिल्ह्यातील मांगवडगाव तिहेरी हत्याकांडातील पीडित पवार कुटुंबियांची आज सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन पवार कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जावे, यासाठी आपण प्रयत्न करणार असून विशेष सरकारी वकिलाची नेमणूक केली जाईल, असे धनंजय मुंडे म्हणाले.
सदर प्रकरणातील दोषारोपपत्र 50 दिवसांच्या आत दाखल करावे अशा सूचना धनंजय मुंडेंनी पोलीस अधिकाऱ्यांना केल्या. दरम्यान सामाजिक न्याय विभागामार्फत हत्या झालेल्या पीडित कुटुंबियांना 13 लाख रुपये मदत देण्यात आली आहे.
बीडमध्ये नेमकं काय झालं होतं?
शेतीच्या वादातून एका कुटुंबावर हल्ला करण्यात आला. तिथे झालेल्या वादातून तीन जणांची गुरुवारी निर्घृण हत्या करण्यात आली. तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना मांगवडगाव इथे घडली असून तिहेरी हत्येनं बीड हादरलं. मांगवडगाव इथे शेतजमिनीचा वाद दोन गटांमध्ये टोकाला गेला. या वादातून एकाच कुटुंबातील तीन जणांसह एका व्यक्तीवर गावातील काही अज्ञातांनी हल्ला केला. पूर्ववैमनस्यातून अज्ञातांनी एकाच कुटुंबातील तिघांना संपवलं.
'आता आम्ही त्यांना मारणार'
'जशी आमची माणसं मारली, तशी त्यांचीही माणसं मारणार, तो पर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाहीत,’ अशा शब्दांत मयत पवार कुटुंबातील सदस्यांनी आपला संताप व व्यक्त केला होता. नातेवाईकांच्या या आक्रमकपणामुळे पोलिसांसमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली होती.
संपादन - अक्षय शितोळे