Home /News /maharashtra /

भाजपची डोकेदुखी आणखीनच वाढली, विनायक मेटेंनी जाहीरपणे बोलून दाखवली नाराजी

भाजपची डोकेदुखी आणखीनच वाढली, विनायक मेटेंनी जाहीरपणे बोलून दाखवली नाराजी

मित्रपक्षाने गंभीर आरोप केल्याने औरंगाबादच्या पदवीधर निवडणुकीत भाजपच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत.

बीड, 17 नोव्हेंबर : भाजपमधील काही नेत्यांना औरंगाबाद पदवीधरची जागा निवडून आणायची नाही असा गंभीर आरोप शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आणि आमदार विनायक मेटे यांनी केला आहे. ते बीडमध्ये माध्यमांशी बोलत होते. अगोदरच भाजप पक्षांतर्गत बंडखोरीने औरंगाबादची पदवीधर निवडणूक गाजली आहे. त्यातच मित्रपक्षाने गंभीर आरोप केल्याने औरंगाबादच्या पदवीधर निवडणुकीत भाजपच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत. बीडमध्ये आज शिवसंग्राम पक्षाच्या वतीने पदवीधर निवडणुकीसंदर्भात मराठवाडा विभागीय बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार विनायक मेटे यांनी शिवसंग्राम पक्षाची भूमिका थोड्या दिवसांमध्ये स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. भाजपने त्यांना विश्वासात घेतले नाही, असाही आरोप मेटे यांनी केला आहे. 'भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना जर औरंगाबाद पदवीधर मतदार संघाची जागा निवडून आणायची असेल तर सर्वांना बरोबर घेणे गरजेचे आहे. पण भाजप नेते घटक पक्षाला विचारत नाहीत. तसंच पक्षामध्ये पण राजीनामा सत्र सुरू झाले आहे. बंडखोरीही झाली आहे. यातच काही लोकांना नक्की काय करायचे आहे, जे पक्षाची अडवणूक करत आहेत त्यांना भाजपला विजय मिळवून द्यायचा नाही, असं माझं मत आहे,' असं म्हणत विनायक मेटे यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. भाजपला विचारला खरमरीत प्रश्न 'शिवसंग्राम हा पक्ष 2014 पासून भाजपसोबत आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निवडताना घटक पक्ष व मित्रपक्षांना विचारात घेतले नाही. महाराष्ट्रातल्या पदवीधरच्या उमेदवारी जाहीर करताना घटक पक्ष व मित्रपक्षांना विचारलं नाही. सगळ्यात मोठा कहर म्हणजे मराठवाडा पदवीधर मतदार संघामध्ये शिवसंग्राम सोबत आहे की नाही, हे त्यांनी एकदा स्पष्ट करणं फार गरजेचं आहे आणि मला वाटतं भाजपच्या नेत्यांनी याचा विचार केला पाहिजे. आपण ज्यांना सात वर्षापासून विश्वासाने सोबत घेतोय त्यांना आपण खरंच विश्वासात सोबत घेतोय का? फक्त गरज सरो आणि वैद्य मरो अशा पद्धतीची भाजपची भूमिका आहे का?' असा सवाल करत मेटे यांनी भाजपवर निशाणा साधला.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Beed

पुढील बातम्या