बीड, 16 मे : बीडची लोकसभेची जागा सगळ्यात जास्त मताधिक्याने विजय मिळवून देणारी जागा मानली जाते.भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची मुलगी प्रीतम मुंडे यांनी इथे सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येण्याचं रेकॉर्ड केलं होतं.
लोकसभेच्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांना 9 लाख 22 हजार 416 मतं मिळाली. त्या 6 लाख 96 हजार 321 मताधिक्य मिळवून निवडून आल्या.
या निवडणुकीतही भाजपने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना उमेदवारी दिली आहे.त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांना तिकीट दिलं. वंचित बहुजन आघाडी आणि बसपानेही इथे उमेदवार उतरवले आहेत. या सगळ्या उमेदवारांना टक्कर देत प्रीतम मुंडे बीडमधून पुन्हा विजयी होणार का ? याची जोरदार चर्चा आहे.
गोपीनाथ मुंडेंचं निधन
2014 मध्ये आलेल्या मोदी सरकारमध्ये गोपीनाथ मुंडे केंद्रीय ग्रामविकास मंत्री झाले. पण त्यानंतर काही दिवसांतच गोपीनाथ मुंडेंचं दिल्लीमध्ये कार अपघातात निधन झालं. भाजपला हा मोठा धक्का होता.
गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर बीडमध्ये पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत गोपीनाथ मुंडेंची मुलगी प्रीतम मुंडे रिंगणात उतरल्या. त्यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला. त्यांनी काँग्रेसचे अशोक पाटील यांचा पराभव केला.
2014 ची लोकसभा निवडणूक
2014 च्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे बीडमधून लढले आणि त्यांनी 6 लाख 35 हजार 995 मतं मिळवून विजय मिळवला. 2009 च्या लोकसभा निवडणुकीतही गोपीनाथ मुंडेंचा विजय झाला होता. आता पुन्हा एकदा प्रीतम मुंडे ही विजयाची परंपरा कायम राखणार का ते 23 मे ला कळेल.
बीड लोकसभा मतदारसंघात गेवराई, माजलगाव, आष्टी, केज, परळी या विधानसभा मतदारसंघांवर भाजपचं वर्चस्व आहे तर बीड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे.
बीडमध्ये याही निवडणुकीत महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे या बहीणभावांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळाली.
===========================================================================
VIDEO: नथुराम गोडसे देशभक्तच, साध्वी प्रज्ञा यांचं वादग्रस्त वक्तव्य