बीड, 7 जुलै : बीड जिल्ह्यात शेतीच्या वादातून होणाऱ्या हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून याबाबत पोलीस आणि महसूल प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर येत आहे. आजच अंबेजोगाई तालुक्यातील आपेगाव याठिकाणी शेतीच्या वादातून जोरदार हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
एका शेतकऱ्यांला पाच सात जण मिळून काठ्यांनी मारहाण करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. यात पीडित शेतकरी विव्हळत असताना मारहाण सुरूच आहे. अखेर मारहाणीमुळे शेतकरी बेशुद्ध झाल्यानेमारहाण करणाऱ्यानी पळ काढला. काठ्या आणि कुऱ्हाडीने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा पीडित कुटुंबातील व्यक्तीने आरोप केला आहे. या मारहाणीत तीन जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर अंबेजोगाई शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शिवाजी पांडुरंग तट,रमेश पांडुरंग तट, सुनील पांडुरंग तट अशी या प्रकरणातील जखमींची नावं आहेत. या प्रकरणात अद्याप पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नसून पोलीस आरोपीला पाठीशी घालत आहेत, असा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.
कशावरून झाला वाद?
अंबेजोगाई तालुक्यातील आपेगाव येथे तट कुटुंबाची जमीन आहे. या ठिकाणी शेतीचे काम करण्यासाठी गेलेल्या शिवाजी पांडुरंग तट यांच्यावर गावातील काही लोकांनी अचानक हल्ला चढवला. काठीने आणि कुऱ्हाडीने मारहाण केली. तसंच त्यांना सोडवण्यासाठी गेलेल्या दोघांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पीडित कुटुंबाच्या नावे जमीन असताना धमकावून जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. या दिवसा ढवळ्या घडलेल्या प्रकाराने कायद्याचं भय राहिला की नाही हा प्रश्न निर्माण होतो. यापूर्वी केज तालुक्या मांगवडगाव येथील शेतीच्या वादातून तिहेरी खून झाल्याची घटना ताजी असताना हा गंभीर प्रकार समोर आला आहे. या बाबत अद्याप कोणतीच कारवाई न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.