'तुझ्या कुटुंबाला कोरोना झालाय' म्हणत फोडलं तरुणाचं डोकं, अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल

'तुझ्या कुटुंबाला कोरोना झालाय' म्हणत फोडलं तरुणाचं डोकं, अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल

बीडमधील धारुर तालुक्यातील देवठाणा गावात ही घटना घडली आहे.

  • Share this:

बीड, 9 एप्रिल : तुझ्या कुटुंबातील लोकांना कोरोना झाला आहे, असं म्हणत जातीवाचक शिवीगाळ करत काठीने तरुणाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात घडला आहे. मारहाण झालेल्या तरुणाच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. बीडमधील धारुर तालुक्यातील देवठाणा गावात ही घटना घडली आहे.

मारहाणीत जखमी झालेल्याा तरुणावर धारूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

धारुर तालुक्यातील देवठाणा गावातील ऋषिकेश बंडू वावळकर यांच्या घरात घुसून तुझ्या आजी-आजोबा, मामी, मावशीला कोरोना रोग झाला आहे. त्यांना गावाबाहेर काढा असे म्हणत तिघा आरोपींनी शिवीगाळ केली. तसंच लाठी-काठीने मारहाण केली, असा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. या प्रकरणात संचारबंदीचे आदेश डावलल्याप्रकरणी आरोपी, फिर्यादी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, बीड जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेऊनही आष्टीमध्ये कोरोनाचा एक रुग्ण आढळल्यानंतर आता पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. संचारबंदी काटेकोरपणे पाळली जावी यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी आज बीड जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने बीड शहरातून(पंथ संचलन) रॅली काढण्यात आली. तसंच प्रशासन सज्ज आहे, खबरदारी म्हणून आणि जबाबदारी म्हणून घरातून बाहेर पडू नका, बाहेर पडला तर गुन्हा दाखल होईल, असा इशारा या रॅलीच्या माध्यमातून पोलिसांनी दिला.

यावेळी शेकडो पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. आता घरात बसूनच काळजी घ्या, बाहेर निघाला तर गुन्हे दाखल होतील, हा संदेश बीडकरांना प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

संपादन- अक्षय शितोळे

First published: April 9, 2020, 2:34 PM IST

ताज्या बातम्या