बीड, 09 मार्च : मुस्लीम आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडीमध्ये मतभेद असून मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोध स्पष्ट दिसून येत आहे. खरोखर हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी पहिली मुस्लीम आरक्षणाबद्दल भूमिका जाहीर करावी, असं आवाहन शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केलं आहे. तसंच, बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेत सहकारी सोसायटीच्या माध्यमातून कर्जमाफीत कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोपही मेटेंनी केला.
आज बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत विनायक मेटे यांनी महाविकासआघाडी सरकारवर चौफेर हल्लाबोल केला. 'मुस्लिमांना आरक्षण देणे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. मात्र, मुस्लिमांना आरक्षण कसे देणार कुठून देणार त्यासाठी अगोदर राज्य मागासवर्ग आयोगाचे शिफारस आणि मान्यता लागेल. कॅबिनेटमध्ये विषय घ्यावा लागेल, राज्य मागासवर्ग आयोग जातीचा सर्वे करतो, धर्माचा नाही मग मुस्लीम मुस्लिमांना आरक्षण देणार कसे?', असा प्रश्न विनायक मेटे यांनी उपस्थित केला.
'महाविकास आघाडीचे सरकार मुस्लीम आरक्षणासंदर्भात खोटे बोलत आहे. त्यामुळे मुस्लीम समाजाची दिशाभूल करत आहे. महाविकास आघाडीत मुस्लीम आरक्षणावरून मतभेद आहेत हे स्पष्ट झाले आहे. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुस्लीम आरक्षणाला विरोध आहे', असंही विनायक मेटे म्हणाले.
'मुस्लीम आरक्षणाला मुख्यमंत्र्याचा विरोध असेल तर नवाब मलिक मुस्लिमांना आरक्षण देणार कसे, यामुळे मुस्लीम समाजाची दिशाभूल करणे, नवाब मलिकांनी थांबावं', असाही टोला विनायक मेटे यांनी लगावला.
कर्जमाफीत बँकांनी केला घोटाळा
बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेत सहकारी सोसायटीच्या माध्यमातून कर्जमाफीत कोट्यावधीचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोपही मेटेंनी केला. शेतकऱ्यांकडून सोसायटीने कर्ज वसुली केली. मात्र, ते पैसे बँकेकडे भरलेच नाही. बँकेकडे दाखवलीच नाही, या शेतकऱ्यांची नाव महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेच्या यादीत पुन्हा नाव आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे, असंही मेटे यांनी उदाहरण देऊन सांगितलं.
तसंच, 'कर्ज न उचललेल्या शेतकऱ्यांच्या नावावरती कर्ज दाखवून कर्जमाफीचा लाभ गाव पातळीवरील सहकारी सोसायटीच्या सचिव आणि बँकेचे अधिकारी यांनी हा कोट्यवधीचा अपहार केल्याचा दावाही मेटेंनी केला. यासंदर्भात बँकेने कबुली दिली असून सहकारी सोसायट्यांनी केलेला घोटाळा आकडा 400 ते 500 कोटीच्या घरात असल्याचां, विनायक मेटे यांनी सांगितलं.
'या बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली पत्रंही पत्रकार परिषद दाखवत शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या सोसायट्या आणि बँकेतील अधिकारी यांच्यावर कारवाई करावी', अशी मागणीही मेटे यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.