बीड, 12 मार्च : पतीने आत्महत्या केल्यानंतर अंत्यविधी होताच पत्नीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे घडली आहे. पतीच्या विरहातून तरुणीने हे पाऊल उचलल्याचं नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. सदर तरुणीच्या पतीने बुधवारी औरंगाबाद येथे आत्महत्या केली होती. आज पत्नीने स्वतःचे आयुष्य संपवले. एक वर्षापूर्वी लग्न झालेल्या या जोडप्याने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील रणजित जाधव (वय 22) व मिनाक्षी जाधव (वय 20) यांचा एक वर्षापूर्वी विवाह झाला होता. रणजित जाधव हा औरंगाबाद येथे एका खाजगी कंपनीत नोकरी करत असल्याने तो विवाहानंतर पत्नी मिनाक्षीसह औरंगाबाद येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. दरम्यान बुधवारी रणजित जाधव याने औरंगाबाद याठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली.
हेही वाचा- लग्नाचा तगादा लावला म्हणून प्रेयसीचा आला राग; दारावर डोकं आपटून घेतला जीव
रणजित जाधव याच्या आत्महत्येनंतर शवविच्छेदन करुन पार्थिव बुधवारी रात्री उशिरा चकलांबा या गावी आणून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रणजित याने आत्महत्या का केली? याचे कारण अस्पष्ट असताना आणि नातेवाईक दुख:त असतानाच आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास घरालगत असलेल्या शौचालयातील आडूला दोरी बांधून मिनाक्षी हिनेदेखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, मिनाक्षीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या आत्महत्येप्रकरणी चकलांबा पोलीस स्थानकाकडून अधिक तपास करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed crime news, Beed news