पंकजा मुंडेंच्या घोषणेनंतर घडलेल्या 12 महत्त्वाच्या घडामोडी!

पंकजा मुंडेंच्या घोषणेनंतर घडलेल्या 12 महत्त्वाच्या घडामोडी!

पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये 12 डिसेंबरला भगवान गडावर येण्याचं भावनिक आवाहन केलं.

  • Share this:

मुंबई, 02 डिसेंबर : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी 12 डिसेंबर रोजी मोठा निर्णय घेणार असल्याचं घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. भाजपच्या नेत्यांनी पंकजा मुंडे या पक्ष सोडून जाणार नाही, असा खुलासा देण्यास सुरूवात केली आहे. त्यांच्या या घोषणेतंर घडलेल्या घडामोडींचा हा थोडक्यात आढावा...

१) भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे सध्या अस्वस्थ आहेत. विधानसभेच्या निकालानंतर त्यांच्या अस्वस्थेत भर पडली. परळीत त्यांचा धनंजय मुंडे यांनी पराभव केला होता. 'मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे', असा दावा करणाऱ्या पंकजा मुंडे यांना या पराभवामुळे मोठा धक्का बसला. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला हा मोठा धक्का मानला जातो. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून त्या अस्वस्थ असल्याचं मानलं जातंय. त्यामुळे मला तुमच्याशी बोलायचं आहे असं सांगत त्यांनी फेसबुकवरून आपल्या भावना व्यक्त केल्या. अंतर्गत राजकारण आणि पक्षात कमी होत जाणारं महत्त्व यामुळे पंकजा मुंडे या नाराज आहे. असं त्यांच्या जवळच्या लोकांकडून सांगितलं जातंय.

फेसबुकवर भावनिक पोस्ट

२) पंकजा मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 12 डिसेंबर,लोकनेते मुंडे साहेबांचा हा जन्मदिवस...त्या दिवशी बोलेन तुमच्याशी मनसोक्त...जसं तुम्हाला माझ्याशी बोलावं वाटतं, बघावं वाटतं.. तसं मलाही तुम्हाला बोलावं वाटतं. मी महाराष्ट्राच्या लोकांच्या विषयी बोलतेय ...तुमच्याशी संवाद ही उत्सुकता माझ्या मनात आहे..नाहीतरी कोणाशी बोलणार आहे मी? तुमच्याशिवाय माझं कोण आहे? 12 डिसेंबरला आपल्या गोपीनाथगडावर भेटू !! येणार ना मग तुम्ही सर्व? मावळे येतील हे नक्की !!!!

३) पंकजा मुंडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून भाजप हा शब्द हटवला आहे. याआधी पंकजा मुंडे यांच्या प्रोफाईलचं यूजरनेम पंकजा मुंडे, भाजप असं होतं. पण आता ट्विटरवर पेजवर फक्त @Pankajamunde लिहलं आहे.

मोदींसोबतचा डीपीही हटवला

४) फेसबुक पोस्ट आणि ट्विटर प्रोफाइलमधील बदलानंतर आता त्यांनी व्हॉटसअॅपवर डीपी बदलला आहे. याआधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा डीपी लावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पंकजा त्यांच्या मतदारसंघात शिव मंदिरात प्रार्थना करत असलेला फोटो लावला होता. तो फोटो काढल्यानं पंकजा मुंडे यांनी नेमकं ठरवलंय तरी काय असा प्रश्न कार्यकर्त्यांसह सर्वांनाच पडला आहे.

मावळे शब्दामुळे राजकीय चर्चांना उधाण

05) पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये 12 डिसेंबरला भगवान गडावर येण्याचं भावनिक आवाहन केलं. या पोस्टच्या अखेरीस त्यांनी मावळे हा शब्दाचा उल्लेख केला. मावळे या शब्दामुळे पंकजा सेनेत तर प्रवेश करणार नाही, ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.

06) पंकजा मुंडे या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर संजय राऊत यांना विचारलं असता येत्या 12 डिसेंबरला ते सगळ्यांना समजेल. पण पंकजा मुंडेच काय तर राज्यातले अनेक नेते सेनेच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे.

07) संजय राऊत यांच्या दाव्यामुळे भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली. त्यांच्या दाव्यामध्ये काही तथ्य नाही, आमचे कोणी संपर्कात नाही, असं भाजप नेते विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं. तसंच पंकजा मुंडे नाराज नाहीत, ते भाजपा सोडणार नाहीत. विधान परिषदेत कोणतंही पद पंकजा मुंडे यांनी मागितलेले नाही, असंही तावडे यांनी स्पष्ट केलं.

08) तावडे यांच्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली.  पंकजाताई शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा खोट्या असल्याचं, चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

09)  पंकजा मुंडे यांचे विश्वासू महादेव जानकर यांनी मात्र न्यूज18 लोकमतशी बोलताना शिवसेना प्रवेशाची शक्यता फेटाळून लावली. पंकजाताई या कुठेही जाणार नाही, त्या भाजपमध्येच राहणार असल्याचंही ते म्हणाले. सोशल मीडियावर काय चर्चा होते त्याला काही अर्थ नाही. विधानसभा निकालानंतर त्या शांत आहेत हे खरं असलं तरी त्या लवकरच सक्रिय होतील, असंही ते म्हणाले होते.

10) पंकजा मुंडे या कधीही भाजप सोडण्याचा विचार करू शकत नाही. त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांनी भाजप वाढवला, याचे भान त्यांना आहे. स्वतःशी चिंतन करणे कधीही चांगले असते. तेच त्या करत आहेत. त्यांच्या 'फेसबुक पोस्ट'चा मीडियाने वाटेल तसा अर्थ लावला. तशा ते बातम्याही करू शकतात, असे मत पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले.

...म्हणून पंकजा मुंडे नाराज

11) सुरूवातीच्या काळात पंकजा मुंडे यांनी स्वत:ला मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करायला सुरुवात केली होती. त्याची चर्चाची अनेकदा झाली. त्यातूनच देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात शीतयुद्धाला सुरुवात झाल्याचं बोललं जातंय. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय मुंडे यांनी चिक्की प्रकरणात अनेक आरोप केले होते. त्या आरोपांना भाजपमधल्याचं काही लोकांनी खतपाणी पुरवलं असं त्यांना वाटतं होतं. त्यानंतर त्यांच्यात आणि फडणवीसांमध्ये फारसं सख्य राहिलं नाही असं बोललं जातंय. विधानसभेतल्या पराभवाला भाजपमधल्याच काही लोकांनी बळ पुरवलं. त्यात मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे, असं पंकजा मुंडे यांना वाटतं. आपले पंख छाटण्यासाठीच आपल्या विरोधकांना रसद पुरवली गेली असंही त्यांचं मत आहे. त्यातच देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडे यांच्या मदतीने अजित पवारांशी संधान साधलं याची चर्चा आहे. त्यामुळेही पंकजा मुंडे या नाराज आहेत.

उद्धव ठाकरे यांनी मानले आभार

12) उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी टि्वट करून उद्धव यांचं अभिनंदन केलं. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'आपले मनःपूर्वक धन्यवाद पंकजा ताई मुंडे! 'राज्याचे हित प्रथम' याच संस्कृतीने आणि परंपरेने महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल आणि स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल असा विश्वास मी तुम्हाला देतो.' असं म्हणत आभार मानले.

Published by: sachin Salve
First published: December 2, 2019, 6:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading