बारामतीत सरपंचाच्या पतीवर सपासप वार करून संपवलं, संतप्त गावकऱ्यांनी मारेकऱ्याच्या घरासह वस्ती पेटवली

बारामतीत सरपंचाच्या पतीवर सपासप वार करून संपवलं, संतप्त गावकऱ्यांनी मारेकऱ्याच्या घरासह वस्ती पेटवली

मंदिराच्या परिसरात आरोपी महिलांना त्रास देत होता. त्यामुळे सरपंच जयश्री थोरात यांचे पती युवराज थोरात यांनी या तरुणाला हटकले होते

  • Share this:

जितेंद्र जाधव, प्रतिनिधी

बारामती, 15 जानेवारी : राज्यभरात मकरसंक्रांतीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. बारामतीमध्ये मात्र, मकरसंक्रांती निमित्त मंदिरात पुजा करत असताना झालेल्या वादातून सरपंच जयश्री युवराज थोरात यांच्या पतीची हत्या करण्यात आली. पारधी समाजातील तरूणाने हत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

बारामती तालुक्यातील सोनगाव येथील विद्यमान सरपंच जयश्री युवराज थोरात यांचे पती युवराज थोरात यांची आज दुपारी सोनेश्वर मंदिरजवळ  तरुणाने धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. युवराज थोरात यांच्या हत्येनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून जोपर्यंत हत्या करणाऱ्या आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत  सदर मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा नातेवाईकांनी पवित्रा घेतला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सोनेश्वर मंदिरात महिला पूजा करण्यासाठी येत होत्या. त्यावेळी मंदिराच्या परिसरात आरोपी महिलांना त्रास देत होता. त्यामुळे सरपंच जयश्री थोरात यांचे पती युवराज थोरात यांनी या तरुणाला हटकले होते. त्याचा राग धरून त्याने या तरुणाने धारधार शस्त्राने  थोरात यांच्यावर सपासप वार करून हत्या केली. यात थोरात यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, सरपंच जयश्री  थोरात यांचे पती युवराज थोरात यांच्या हत्येमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. संतप्त झालेल्या नागरिकांनी सोनगाव येथे राहत असणाऱ्या पारधी समाजाची दहा ते बारा घरे पेटवून दिल्या आहेत. जोपर्यंत हत्या करणाऱ्या आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत  सदर मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा सरपंच यांच्या नातेवाईकांनी घेतला आहे. सध्या या परिसरात तणावाचे वातावरण आहे.

पतंग पकडण्याच्या नादात हा मुलगा विहिरीत कोसळला

संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रांतीचा उत्सव आनंदाने साजरा होत असताना नाशिकच्या सिन्नरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सिन्नरच्या उगले लॉन्सजवळील शेती परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेत आर्यन विलास नवाळे या 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. सकाळी 9:15 च्या सुमारास पतंग पकडण्याच्या नादात हा मुलगा कठड्यावरून विहिरीत कोसळला. यामध्ये पाण्यात बुडाल्याने मुलाचा मृत्यू झाला आहे.

साधारण 35 फूट पाणी असलेल्या विहिरीत पडल्याने आणि कुठलीच मदत मिळू न शकल्याने त्याचा अंत झाला. दीड तास प्रयत्न केल्यानंतर सिन्नरच्या अग्निशामक दलास त्याचा मृतदेह काढण्यात यश मिळालं. आई-वडिलांनी घटनास्थळी टाहो फोडत पतंगाप्रती आपला रोषही व्यक्त केला आहे. संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवताना आयुष्याची दोर तुटल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Published by: sachin Salve
First published: January 15, 2020, 6:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading