बारामती, 29 मार्च : बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे येथे मुलानेच गोळ्या झाडून आपल्या वडिलांचा खून केल्याची घटना घडली आहे. शेतजमीन आणि संपत्तीच्या वादातून पोटच्या मुलानेच आपल्या वडिलांवर गोळ्या झाडून नंतर स्वतःवर गोळ्या घालून घेतल्या आहेत.
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे येथे मुलगा दिपक खोमणे आणि वडील धनंजय धोंडिबा खोमणे (वय-75) यांचा जमिनीचा वाद अनेक वर्षांपासून सुरू होता. अ्नेकांनी हा वाद सोडवण्यासठी मध्यस्थी केली. मात्र याला यश आलं नाही. त्यानंतर या वादाने टोक गाठलं आणि आज सकाळी पोटचा मुलगा दीपक खोमणे याने आपल्या वडिलांवर रिवॉल्व्हरने गोळ्या घातल्या. त्यानंतर त्याने स्वतःवर देखील गोळ्या घालून घेतल्या. यामध्ये वडील धनवंतराव खोमणे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मुलगा दीपक खोमणे याने स्वत:वरही गोळ्या झाडल्याने त्याच्यावर बारामती येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे जमिनीच्या वादातून संपूर्ण कुटुंबच उद्धवस्त झाल्याचं दिसत आहे. दिपक हा बारामती तालका खरेदी विक्री संघाचा माजी व्हाईस चेअरमन आणि विद्यमान सदस्य म्हणून पदावर आहे.
हेही वाचा- देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात, आतापर्यंतचा आकडा 193 वर
दरम्यान, या घटनेमुळे बारामती तालुका आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांचा खून केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी अधिकचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर हे करत आहेत.