लोकसभेच्या रिंगणात खासदार सुप्रिया सुळेंच्या विरोधात आमदार राहुल कुल यांच्या पत्नी ?

लोकसभेच्या रिंगणात खासदार सुप्रिया सुळेंच्या विरोधात आमदार राहुल कुल यांच्या पत्नी ?

सपचे आमदार राहुल कुल काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • Share this:

बारामती, २४ जानेवारी, जितेंद्र जाधव : लोकसभेच्या निवडणुकीसाठी युतीचे आणि आघाडीचे आखाडे बांधले जात आहेत. बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात रासपचे जानकर यांनी आपणच लढणार असे सांगितले होते. त्यातच आता रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल खासदार सुळे यांच्या विरोधात लढणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्य़ावेळी बारामतीत रासपचे आमदार राहुल कुल यांनीही मोदींशी संवाद साधला. दौंड विधानसभा मतदारसंघात राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध कामे होत असल्याचं त्यांनी सांगितलं. मोदी सरकार विविध योजना चांगल्या पद्धतीने राबवून त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहचवत असल्याबद्दल राहुल कुल यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.

बारामतीत पंतप्रधान मोदींनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यासाठी आमदार कुल भाजपचा पंचा परिधान करून उपस्इत राहिले होते. मात्र मोदींनी दिलेल्य़ा घोषणांना राहुल कुल यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे खरंच राहुल कुल खासदार सुप्रिया सुळेंच्या विरोधात पत्नीला उभा करणार का ? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

एकीकडे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी बारामतीतून लढण्याची घोषणा केली असतानाच राहुल कुल यांच्या पत्नी कांचन या खासदार सुप्रिया सुळेंविरोधात लढणार असल्याची चर्चा रंगली आहे. राहुल कुल यांच्या पत्नी कांचन यांना भाजपकडून उमेदवारीची चर्चा सुरू आहे. आता रासपचे आमदार राहुल कुल काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपण स्वतः दिल्लीमध्ये काम करण्यास इच्छुक असल्याने आपण लोकसभा निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली होती. इतकंच काय तर बारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ असल्याचेही ते म्हणाले होते.

First published: January 24, 2019, 8:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading