अशी रंगते बंजारा होळी!

सध्या होळीतील बंजारा लोकगीतांनी तिथल्या लोकांवर चांगलंच गारुड घातलंय. काय आहे ही बंजारा लोकसंस्कृती?

  • Share this:
कुंदन जाधव,अकोला, 01 मार्च : होळीचा सण आज सगळीकडेच उत्साहात साजरा होतोय. पण त्यातही खास आकर्षण असतं ते बंजारा होळीचं. सध्या होळीतील बंजारा लोकगीतांनी तिथल्या लोकांवर चांगलंच गारुड घातलंय. काय आहे ही बंजारा लोकसंस्कृती? बंजारा समाजात होळीचा सण अगदी दिवाळीसारखाच साजरा होतो, लोकगीतं हे बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे खास आकर्षण.  खरं तर होळीच्या आधी येणाऱ्या दांडी पौर्णिमेपासून त्यांच्या होळीला सुरुवात होते. या गीतांना 'लेंगीगीत' असेही म्हटले जाते. बंजारा समाजाच्या होळीत 'पाल','गेर', 'फगवा', 'धुंड' अशा अनेक परंपरा जोपासल्या जातात. बंजारा समाजाचा हा होळी उत्सव गुडीपाडव्यापर्यंत चालतो. होळीच्या काळात फेर धरून गायली जाणारी लोकगीतं आणि या उत्सवातील महिलांचं स्थान ठसठशीतपणे दिसतं. बंजारा समाजाची होळी आपल्या होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जातेय. आपल्या आणि या होळीमधला महत्त्वाचा फरक म्हणजे ही होळी पहाटेच्या वेळी पेटविली जातेय. ज्यांचे लग्न या वर्षात करायचे आहे अशी उपवर मुले होळीसाठी लाकडं जमा करतात. या उपवर मुलांना 'गेरीया' असं म्हटलं जातं. यासोबतच अनेक रूढी परंपरा या बंजारा होळीत आहेत. याच दिवशी ज्यांच्या घरी मुलगा झाला त्यांच्याकडे त्या बाळाची 'धुंड' साजरी केली जाते. 'धुंड' म्हणजे घरी मुलगा झाल्यावर साजरा केलेला आंदोत्सव. यावेळी तांड्यातील सर्वांना गोड-धोड खायला दिलं जातं. होळी इतरत्र महिलांना फारसं स्थान नसतं, पण बंजारा समाजातल्या होळीतलं महिलांचं विशेष स्थान निश्चितच सुखावून जाणारं आहे.
First published: