कोल्हापुरात घडू शकते अनुचित घटना? जिल्हादंडाधिकाऱ्यांकडून जिल्हा बंदीचे आदेश

जिल्ह्यात झालेल्या मोठ्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या महापुराची परिस्थितीमुळे विस्कळीत झालेले मन यातून पूरगस्त व नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 13, 2019 07:41 PM IST

कोल्हापुरात घडू शकते अनुचित घटना? जिल्हादंडाधिकाऱ्यांकडून जिल्हा बंदीचे आदेश

कोल्हापूर, 12 ऑगस्ट- पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापुराने कहर केला आहे. महापूरामुळे हजारो नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. सांगली आलेल्या नैसर्गिक आपत्तीने आतापर्यंत 22 जणांचा बळी घेतला आहे तर एक अद्याप बेपत्ता आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या मोठ्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या महापुराची परिस्थितीमुळे विस्कळीत झालेले मन यातून पूरगस्त व नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काही अनपेक्षित घटना घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्र पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 37(1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यात 12 ते 24 ऑगस्टला रात्री 12 वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्हा बंदीचे आदेश जारी केल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी दिली आहे.

आज (12 ऑगस्ट) मुस्लिम बांधवांचा साजरा होणारा बकरी ईद सण, 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतात साजरा होणारा स्वतंत्र दिवस व 24 ऑगस्ट रोजी साजरा होणारा दहीहंडी सण आदी सणांचे औचित्य साधून आत्महत्या, आमरण उपोषण, ठिय्या आंदोलन, पक्ष संघटनांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी वारंवार होणारी आंदोलने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा बंदीचे आदेश जारी करण्यात आल्याचे जिल्हादंडाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, पूर परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हल‍विण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील पूरग्रस्त भागातील 4 लाख 66 हजार 963 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. या नागरिकांसाठी 441 तात्पुरता निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. राष्ट्रीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या 33 पथकांसह आर्मी, नौदल, तटरक्षक दलाची एकूण 111 बचाव पथके कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी वैद्यकीय सेवा कार्यरत असल्याची माहिती राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे.

पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांमध्ये 105 बचाव पथके कार्यरत करण्यात आली आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 54 तर सांगली जिल्ह्यात 51 पथकांचा समावेश आहे. याशिवाय पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नागपूर येथेही बचाव पथके कार्यरत आहेत.

पूरग्रस्त कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील बारा बाधित तालुक्यातील 2 लाख 47 हजार 679 तर सांगली शहरासह जिल्ह्यातील चार बाधित तालुक्यातील 1 लाख 73 हजार 89 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 208 तर सांगली जिल्ह्यात 108 तात्पुरता निवारा केंद्र सुरु करण्यात आली आहेत.

Loading...

पावसामुळे पूरस्थितीत असलेल्या राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये बचाव कार्य जोमाने सुरू आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 118 गावांमधील 9 हजार 521, ठाणे जिल्ह्यामधील सात तालुक्यातील 25 गावांमधील 13 हजार 104, पुणे जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 108 गावांमधील 13 हजार 500, नाशिक जिल्ह्यातील पाच तालुक्यातील 5 गावांमधील 3 हजार 894, पालघर जिल्ह्यातील तीन तालुक्यातील 58 गावांमधील २ हजार, रत्नागिरी जिल्ह्यातील सात तालुक्यातील 12 गावांमधील 687, रायगड जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील 60 गावांमधील 3 हजार, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सात तालुक्यातील १८ गावांमधील ४९० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. पूर परिस्थितीमध्ये कोल्हापूर, सांगलीसह सातारा, ठाणे, नाशिक, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये 70 तालुके बाधीत झाले आहेत.

VIDEO: 'आधी या पोरांची आई मेली, आता घरात काही राहिलं नाही'; मन सुन्न करणारी आजींची व्यथा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 12, 2019 03:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...