विधानसभा निवडणुकीत हा नेता काँग्रेसला तारणार का?

विधानसभा निवडणुकीत हा नेता काँग्रेसला तारणार का?

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये मोठे बदल होत आहेत. एकीकडे राहुल गांधींच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असताना महाराष्ट्रातही नेतृत्वबदल होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून बाळासाहेब थोरात यांचं नाव पुढे आलं आहे.

  • Share this:

साहेबराव कोकणे

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये मोठे बदल होत आहेत. एकीकडे राहुल गांधींच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असताना महाराष्ट्रातही नेतृत्वबदल होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून बाळासाहेब थोरात यांचं नाव पुढे आलं आहे.

बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे अत्यंत निष्ठावंत नेते मानले जातात. राज्यातल्या सहकार चळवळीत त्यांचं मोठं योगदान आहे. मराठा समाजाचे मातब्बर नेते, गांधी घराण्याचे विश्वासू अशीही त्यांची ओळख आहे.

नगर जिल्ह्यातल्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सलग सात वेळा विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला आहे. नगरच्या विखे पाटील घराण्याचे ते कट्टर विरोधक मानले जातात. त्यामुळे विखे पाटील यांना शह देण्यासाठीही काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांच्याकडे नेतृत्व दिल्याची चर्चा आहे.

राहुल गांधींपूर्वी अशोक चव्हाणांचा राजीनामा मंजूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही त्यांची जवळीक आहे. राज्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध ठेवण्यातही त्यांची हातोटी आहे. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदाची जबाबदारी सांभाळली आहे. काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी महसूल, कृषी आणि शिक्षण खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिलं होतं. गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे काँग्रेस पक्षाचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी हिमाचल प्रदेशचे प्रभारी म्हणूनही काम पाहिलं होतं.

सहकार चळवळीत पुढाकार

बाळासाहेब थोरात यांचं सहकार चळवळीतही मोठं योगदान आहे. संगमनेरमध्ये त्यांनी सहकारी दूधसंस्था स्थापन केली. जिल्हा सहकारी बँकेचे ते अध्यक्षही होते. संगमनेरमध्ये शिक्षणसंस्था, दूधसंस्था, सहकारी साखर कारखाना या सगळ्यामध्ये त्यांचा पुढाकार आहे. त्यामुळे गोरगरीब आणि जनसामान्यांमध्येही ते लोकप्रिय आहेत. या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा काँग्रेसला फायदा होऊ शकतो.

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील भाजपमध्ये आल्यानंतर नगरमधल्या राजकारणाने वेगळं वळण घेतलं. सुजय विखे पाटील यांचा पराभव करण्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी त्यांची सगळी ताकद पणाला लावली होती.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी राजीव सातव, बाळासाहेब थोरात यांची नावं चर्चेत होती. पण बाळासाहेब थोरात यांची राजकीय कारकीर्द पाहता त्यांच्या नावाला पसंती मिळाली. दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या बैठकीत बाळासाहेब थोरात यांच्या नावावर सहमती झाली. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणं मात्र बाकी आहे. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला नवी उभारी देण्याचं आव्हान बाळासाहेब थोरात यांच्यासमोर आहे.

=======================================================================================

VIDEO: तुंबलेलं पाणी दिसत नाही; मनसेकडून महापौरांना जाड भिंगाचा चष्मा भेट

First published: July 2, 2019, 6:52 PM IST

ताज्या बातम्या