मुंबई, 23 जानेवारी : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनामध्ये त्यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही हजेरी लावली. या कार्यक्रमात झालेल्या भाषणावेळी अजित पवार यांनी बाळासाहेबांच्या उल्लेखाबाबत नाराजी व्यक्त केली.
बाळासाहेबांच्या तैलचित्रावर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं असल्याचं सांगितलं जात आहे, पण त्याऐवजी शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं असायला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या मागणीवर नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं, त्यामुळे राणे आणि अजित पवार यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळालं.
'बाळासाहेब हिंदू धार्जिणे होते हे चुकीचं आहे. हिंदू, मुस्लिम, शीख सगळ्यांबाबत त्यांच्या मनात आदर होता, आजही आहे. बाळासाहेबांनी यापूर्वी आरपीआय, मुस्लीम लीग यांचाही पाठिंबा घेतला होता. नामदेव ढसाळ, रामदास आठवले यांच्यासोबतही युती केली होती, पण ते पाकिस्तानविरोधी होते. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांनाही त्यांनी पाठिंबा दिला होता. प्रतिभा पाटील, प्रणब मुखर्जी यांनाही राष्ट्रपतीपदासाठी बाळासाहेबांचा पाठिंबा होता,' असं अजित पवार यांनी सांगितलं.
'या तैलचित्रासाठी ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतला त्यांचं मी अभिनंदन करतो. बाळासाहेबांचं तैलचित्र विधानभवनात असणं ही मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. बाळासाहेबांचं जीवन खुल्या पुस्तकासारखं होतं. त्यांच्या वागण्यात बोलण्यात स्पष्टता होती. जे पोटात तेच ओठात. जे बाळासाहेबांनी करून दाखवलं ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. यात तोडमोड झाली नाही पाहिजे', अशी मागणीही अजित पवार यांनी केली.
अजित पवार वादात
याआधीही छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नसून स्वराज्य रक्षक होते, असं विधान अजित पवारांनी केलं होतं. अजित पवारांच्या या विधानाचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. अजित पवार यांच्याविरोधात भाजपने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं.
राणेंचं भाषण, नीलम गोऱ्हेंचा आक्षेप, भुजबळांचा हात, विधानभवनातल्या गोंधळाचा Video
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Balasaheb Thackeray