मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

औरंगाबादचा समोसा-रस्सा राईस खाल्ला का? नाश्ता करण्याची पहिली चॉईस, पाहा VIDEO

औरंगाबादचा समोसा-रस्सा राईस खाल्ला का? नाश्ता करण्याची पहिली चॉईस, पाहा VIDEO

औरंगाबाद शहरातील त्रिमूर्ती आप्पाचा ( Trimurti Aappa Nashta Center ) समोसा रस्सा राईस प्रसिद्ध असून या समोसा रस्सा राईसची गेल्या 20 वर्षांपासून औरंगाबादकरांना भुरळ पडली आहे.

औरंगाबाद, 22 ऑगस्ट : समोसा ( Samosa ) हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. चहा सोबत समोसा खाणे अनेकांना आवडते. मात्र, रस्या सोबत समोसा राईस खाण्याची मजा काही औरच असते. औरंगाबाद शहरातही त्रिमूर्ती आप्पाचा  ( Trimurti Aappa Nashta Center ) समोसा रस्सा राईस प्रसिद्ध असून या समोसा रस्सा राईसची गेल्या 20 वर्षांपासून औरंगाबादकरांना भुरळ पडली आहे. या समोसा रस्सा राईसने खवय्यांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. हा समोसा रस्सा राईस खाण्यासाठी शहरातील विविध भागातील नागरिक मोठी गर्दी करत असतात.

अशी झाली समोसा रस्सा राईसची सुरुवात 

मूळचे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील असलेले दादासाहेब घोडे व अजिनाथ घोडे यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते 1994 मध्ये औरंगाबाद शहरांमध्ये कामानिमीत्त आले. सुरुवातीला त्यांनी शहरातील कंपन्यामध्ये कँटीनमध्ये स्वयंपाकी लोकांच्या हाताखाली काम केलं. त्यानंतर हळूहळू स्वयंपाक शिकल्यानंतर स्वतःचा व्यवसाय करण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी 2000 साली सिडको परिसरातील छत्रपती महाविद्यालयाच्या कमानी समोर हातगाडीवर नाश्ता सेंटर सुरू केलं. यासाठी त्यांनी हातगाडी भाड्याची घेतली होती. सुरुवातीला ब्रेड वडा, आलू वडा, समोसा यासारखे नाश्त्याचे पदार्थ ठेवले यासोबतच राईस देखील ठेवला. 

हातगाडीवर ठेवलेल्या ब्रेड वडा, आलू वडा, समोसा या पदार्थांसोबत ग्राहक हे राईस मागवत होते. दरम्यान ही गोष्ट घोडे बंधूंच्या लक्षात आली आणि त्यांनी यावरती पर्यायी शोधत 2002 साली समोसा रस्सा राईस हॉटेलच्या माध्यमातून ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला.

हेही वाचा : पुण्यातील 50 वर्ष जुना गार्डनचा वडापाव, आजही आहे खवय्यांची पहिली पसंती

दादासाहेब घोडे, अजिनाथ घोडे, अप्पासाहेब घोडे या तिघा भावांनी मिळून सुरू केलेली हॉटेल या हॉटेलचे नाव काय ठरवायचं यावरून तीन भावंड असल्यामुळे त्रिमूर्ती असं हॉटेलचं नाव ठेवण्यावर तिघा भावांचे एकमत झाले आणि हॉटेलचे नाव त्रिमूर्ती ठेवण्यात आलं. त्यासोबतच लहान भावाला लाडाने आप्पा म्हणत असल्यामुळे त्रिमूर्ती आप्पा असं नाव ठेवण्यावरती तिघे भावांचे एक मत झालले  आणि तेव्हापासून त्रिमूर्ती आप्पा हे नाव औरंगाबादकरांच्या सेवेत आहे.

समोसा आणि राईस बनवण्यासाठी हे साहित्य वापरतात 

तांदूळ, जिरा, मोहरी, तेल, मिरची पावडर, हळदी, बीट रूट, शीमला, गाजर इत्यादी साहित्य राईस साठी वापरतात तर समोसा बनवण्यासाठी आलू, मसाला, बेसन, जिरा  इत्यादी साहित्य वापरतात. तर स्पेशल पद्धतीने रस्सा बनवला जातो. यासाठी दर्जेदार साहित्य वापरतो असे घोडे बंधू सांगतात. या समोसा रस्सा राईसची किंमत 70 रुपये आहे. 

औरंगाबाद शहरांमध्ये हातगाडीवर सुरू केलेल्या हा व्यवसाय आता एका मोठ्या हॉटेलमध्ये रूपांतरित झाला आहे. ग्राहकांचे प्रेम यामुळे हे शक्य झालं असं घोडे बंधू सांगतात. यामुळे जोपर्यंत आम्हाला शक्य होईल तोपर्यंत ग्राहकांची सेवा करू असं देखील आजिनाथ घोडे सांगतात.

सिडको परिसरामध्ये असलेला आप्पाचा समोसा रस्सा राईस मी गेल्या 6 वर्षांपासून खात आहे. तेव्हा जी टेस्ट होती ती आजही कायम आहे. आप्पाच्या स्पेशल समोसा रस्सा राईसची औरंगाबाद मध्ये चर्चा असल्यामुळे आम्ही नेहमी हा समोसा रस्सा राईस खात असतो, असं ग्राहक आकाश खरात सांगतात.

गुगल मॅप वरून साभार

पत्ता 

तुम्हाला जर या ठिकाणी नाश्ता करायचा असेल तर औरंगाबाद शहरातील सिडको भागामध्ये असलेल्या हायकोर्टच्या बाजूला त्रिमूर्ती आप्पा नाष्टा सेंटर म्हणून आहे.  येथे तुम्हाला नाश्ता करता येऊ शकतो. त्यासोबतच येथे तुम्हाला पार्सल सुविधा देखील उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी  78754 01600 या नंबर वर संपर्क साधू शकता.

First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News