Aurangabad : 15 वर्षांपासून रस्त्यावर अंधार; प्रशासकीय दुर्लक्षामुळे वसाहतीमध्ये काळोख, पाहा VIDEO
Aurangabad : 15 वर्षांपासून रस्त्यावर अंधार; प्रशासकीय दुर्लक्षामुळे वसाहतीमध्ये काळोख, पाहा VIDEO
औरंगाबाद शहरामध्ये 15 वर्षांपूर्वी बीड बायपास परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी सुधाकर नगर ही वसाहत निर्माण झाली. मात्र, या वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पथदिवे ( Street lights ) बसवण्यात आले नसल्यामुळे अंधारातून वाट काढावी लागत आहे.
औरंगाबाद, 30 जुलै : आशिया खंडात सर्वात वेगाने विकसित होणारी औद्योगिक वसाहत म्हणून औरंगाबाद शहराचा उल्लेख केला जातो. शहरातील उद्योग त्यासोबतच रोजगाराच्या शिक्षणाच्या संधीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक औरंगाबाद शहरात (Aurangabad City) राहण्यासाठी येत आहेत. यामुळे शहराचा दिवसेंदिवस विस्तार वाढत आहे. जुन्या शहरांप्रमाणेच नवीन भागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नागरिक राहत आहेत. बीड बायपास परिसरामध्ये डोंगराच्या पायथ्याशी सुधाकर नगर (Sudhakar Nagar In Aurangabad ) ही वसाहत निर्माण झाली. मात्र, या वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर व सुधाकर नगर वसाहती मध्ये पथदिवे ( Street lights ) बसवण्यात आले नसल्यामुळे 15 वर्षांपासून अंधारातून वाट काढावी लागत आहे.
औरंगाबाद शहरामध्ये 15 वर्षांपूर्वी बीड बायपास परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी सुधाकर नगर ही वसाहत निर्माण झाली. येथील रहिवाशांनी लाखो रुपये खर्च करून घरे बांधली. मात्र, येथील रहिवाशांना अद्यापही या ठिकाणी सोयी सुविधा मिळत नाहीत. बजाज हॉस्पिटल ते सुधाकर नगर पर्यंत पथदिवे बसवण्यात आले नसल्यामुळे रात्री अप रात्री गस्त करून येणाऱ्या पोलिसांना व या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अंधारातून वाट काढावी लागत आहे. यामुळे या रस्त्यावर लवकरात लवकर पथदिवे बसवण्यात यावे अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत.
पथदिवे नसल्यामुळे काढावी लागते अंधारातून वाट
पोलिसांची नोकरी म्हणलं तर त्याला 24 तास जागरूक राहावं लागतं कधी कुठला बंदोबस्त कधी कुठली कारवाई करावी लागेल हे सांगता येत नाही. यामुळे दिवस रात्र त्यांना अलर्ट राहावं लागतं. असे असताना सुधाकर नगर परिसरातील राहणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना पथदिवे बसवण्यात आले नसल्यामुळे अंधारातून वाट काढावी लागते. कच्चा रस्ता असल्यामुळे अंधारातून वाट काढत असताना पाण्यामुळे अनेकदा वाहने स्लिप होऊन मार देखील लागत असतो. यामुळे येथील नागरिकांसोबतच पोलीस अधिकारी सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत.
आम्ही काही वर्षापासून या सुधाकर नगर परिसरामध्ये राहतो लाखो रुपये खर्च करून आम्ही घर बांधलं. मात्र अद्यापही या ठिकाणी सुविधा नाहीयेत. रात्री अपरात्री आमच्या आई बहिणी कामानिमित्त घराबाहेर पडतात बाहेर काळाकुट्ट अंधार असतो. सुधाकर नगरच्या कच्च्या रस्त्यातून पावसाळ्यामध्ये अंधारातून वाट काढावी लागते. यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर पथदिवे बसवण्यात यावे, अशी मागणी या भागातील रहिवाशी प्रितेश पगारे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची अनेक वेळा भेट घेऊन पथदिवे बसवण्यासाठी येथील नागरिकांनी मागणी केली आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप कुठला प्रतिसाद मिळत नसल्याचे येथील रहिवासी सांगतात. या समस्या संदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही . यामुळे सुधाकर नगरवासी यांच्या या तक्रारी संदर्भात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.