औरंगाबाद, 25 जानेवारी : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी प्राचार्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. संतोष बांगर यांच्या या दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल झाला, यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे, तसंच आपण याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिल्याचंही बांगर म्हणाले आहेत.
'माझा व्हिडिओ दाखवण्यापेक्षा प्राचार्य आणि उपप्राचार्यांना जाऊन विचारा, हा प्रकार का घडला. एखाद्या महिलेवर अत्याचार होत असेल तर तो मी सहन करणार नाही. मग माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल. सरकारमध्ये असलो तरी आवाज उठवणारच. मी उपमुख्यमंत्र्यांना सर्व माहिती दिली आहे,' असं संतोष बांगर म्हणाले.
'एखाद्या महिलेवर अन्याय होत असेल तर मी शांत बसणार नाही. त्या महिलेची क्लिप माझ्याकडे आहे, पण कुणाची इज्जत चव्हाट्यावर आणू नये म्हणून क्लिप दाखवणार नाही. मी त्यांना दमदाटी केली तर त्यांनी तक्रार का दिली नाही, याची शहानिशा व्हावी. महिलेच्या इज्जतीसाठी आम्ही शांत आहोत. सरकार आमचं आहे, म्हणून आवाज उठवायचा नाही, असं होत नाही,' अशी प्रतिक्रिया संतोष बांगर यांनी दिली आहे.
प्राचार्याला मारहाण केल्यानंतरही आमदार संतोष बांगर आक्रमक, पुन्हा दिला इशारा#Shivsena #SantoshBangar pic.twitter.com/Impw7dt4fy
— News18Lokmat (@News18lokmat) January 25, 2023
हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीतील शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. डॉ. अशोक उपाध्याय असं या प्राचार्यांचं नाव आहे. हे प्राचार्य महिला प्राध्यापकांना त्रास देत असल्याची तक्रार आमदार बांगर यांच्याकडे आली होती, त्यानंतर तंत्रनिकेतन महाविद्यालयात जाऊन आमदारांनी ही मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला.
आमदार संतोष बांगर पुन्हा वादात, आता शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांनाच मारहाण, Video Viral#SantoshBangar pic.twitter.com/bscfSuXpcD
— News18Lokmat (@News18lokmat) January 24, 2023
संतोष बांगर हे मागच्या काही काळापासून वादात सापडले आहेत. याआधी त्यांनी माध्यान्ह भोजन योजनेत जेवण पुरवणाऱ्या व्यवस्थापकाला निकृष्ट दर्जाचं जेवण देतो, असा आरोप करत मारहाण केली. हिंगोलीमध्येच विमा कंपनी कार्यालयात तोडफोड झाली तेव्हा बांगर यांनी कृषी अधिकाऱ्याला धमकावल्याचा आरोप करण्यात आला. याशिवाय मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोपही संतोष बांगर यांच्यावर करण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.