औरंगाबाद, 22 जानेवारी : औरंगाबादेत (Aurangabad) महाराणा प्रताप (Maharana Pratap) यांचा पुतळा उभारण्यावरुन प्रचंड राजकारण (Politics) पेटलं आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद महापालिकेने या पुतळ्यासाठी 1 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. पण या गोष्टीला खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी विरोध केला आहे. 'पुतळ्याचे एक कोटी ग्रामीण भागात सैनिकी शाळा उभारण्यास करा, पण फक्त पुतळा उभारायचे असेल तर माझा ठाम विरोध आहे, अशी भूमिका जलील यांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेवरुन शिवेसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी सडकून टीका केली आहे. "पुतळ्याला विरोध करायचा, हिंदूंना डिवचायचं, राजपूत समाजाला डिवचायचं हे त्यांचं नेहमीचं कटकारस्थान असतं", असा घाणाघात खैरे यांनी केला. तसेच जलील यांनी मागे दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या पुतळ्यालाही विरोध केला होता, असंही ते यावेळी म्हणाले. खैरे यांनी 'न्यूज 18 लोकमत'ला विशेष मुलाखत दिली. यावेळी ते बोलत होते.
चंद्रकांत खैरे नेमकं काय म्हणाले?
"कुणाबद्दल बोलतात, काय बोलतात, त्या माणसाला त्याचं भान नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप नसते तर आम्ही आज या जगात राहिलो नसतो. ते कोणाचं राज्य होतं? हिंदूंना मदत करणारे महाराणा प्रताप आणि छत्रपती महाराज यांची प्रेरणा प्रचंड आहे. हे दोन्ही राष्ट्रपुरुष असताना आपण त्यांचे पुतळे किंवा प्रतिमा का उभे करतो? तर त्यांच्याप्रती आपली खूप चांगली भावना निर्माण झाली पाहिजे. त्यांना नमन केलं पाहिजे. त्यांची प्रेरणा आपल्या मनात निर्माण झाली पाहिजे. ते हिंदूत्ववादी असताना त्यांनी अनेकांना मदत केली. इतकं असताना हा इम्तियाज जलील नावाचा प्राणी पुतळा कशाला पाहिजे म्हणून म्हणतो. ग्रामीण भागातील मुला-मुलींना शाळा सुरु आहे. अनेक ठिकाणी सैनिकी शाळा आहेतच. तिथे अनेक सुविधा आहे. आपण त्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून खूप मदत मिळवू शकतो. आम्ही म्हणतो विरोध तर कर आम्ही पाहतो. विरोध करणारे इम्तीयाज जलील कोण आहेत? अधिकृतपणे महापालिकेने 87 लाखांचा बजेट ठेवून काम केलं आहे. अधिकृतपणे कामासाठी टेंडर निघाले आहेत", अशी भूमिका चंद्रकांत खैरे यांनी मांडली.
('पुतळे उभारण्यापेक्षा शाळा उभारूया', महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला जलील यांचा विरोध)
"इम्तियाज जलील हा हिंदूंचा विरोधातील माणूस आहे. वंचित बहुजन आघाडीने देखील त्यांना सोडून दिलं. वंचितच्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्याची चूक कळली. ते कशी व्यक्ती आहे ते त्यांना समजलं आहे. विशेष म्हणजे मुस्लिम समुदायातील अनेक नागरिक त्यांच्याविरोधात आहेत. त्यांच्यावर नाराज आहेत. माझ्याकडे अनेकजण तक्रार घेऊन येतात. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अशाप्रकारे वातावरण दुषित करण्याचा त्यांचा नेहमीत प्रयत्न असतो. हा गड बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. उद्धव ठाकरे यांचा आज पाचवा क्रमांक आला", असं चंद्रकांत खैरे म्हणाले.
"आम्ही मैदानात उतरु. त्यांचा काय संबंध? महापालिकेने ठराव मांडून प्रस्ताव मान्य केला. लोकं त्यांना पाठींबा करत नाहीय. आमच्या भावना दुखवतात. पंतप्रधान मोदींनी सरदार वल्लभाई पटेल यांचा एवढा मोठा पुतळा उभा केला. तो पुतळा कशासाठी उभारला? दम आहे तर जा गुजरातमध्ये, विरोध करुन दाखवा. विरोध करणाऱ्या लोकांना कळत नाही. दंगल झाली त्यावेळी हे लोक कुठे जातात? 2018 मध्ये राजाबजारमध्ये ज्यावेळी दंगल झाली त्यावेळी पुतळे नको असणारी माणसं शेपट्या घालून गेली होती. आम्हाला समजतं. सैनिका शाळा सुरु करण्यासाठी शासकीय यंत्रणा सक्षम आहे", असं खैरे आक्रमकपणे म्हणाले.
'जलील यांचं हप्ताखोरीचं काम चाललंय'
"इम्तियाज जलील कोणत्या मुसलमानची सेवा करतात? कोणत्या हिंदू, दलित बंधूची सेवा करतात? काही नाही करत. फक्त आपलं स्वत:चं चाललंय. सांगू तुम्हाला, बोलू आता? ते काय-काय करतात ते, गुटखे बंद करायचं म्हणून आंदोलन करायचं आणि नंतर हप्ता मागून घ्यायचा. दारुच्या नावाने हप्ता मागून घ्यायचा. सगळं हप्ताखोरीचं काम चाललं आहे. हप्तेखोरीचं काम करुन स्वत:चं बघून राहिले म्हणून एमआयएमचे इतर नगरसेवक फुटून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालली आहेत. ते आपलं स्वत:चं बघत आहेत. आमचा विचार करत नाही, असं नगरसेवक म्हणतात", असा गंभीर दावा खैरे यांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.