औरंगाबाद, 18 जानेवारी : सर्वसामान्य व्यक्तीला दवाखान्याची पायरी चढायचं म्हटलं तर मनात धास्ती बसते. दवाखान्याचा खर्च आणि साहित्य सर्वसामान्य व्यक्तीला परवडण्यासारखं नसतं. अशा गरजू रुग्णांच्या मदतीसाठी औरंगाबाद शहरातील सिडकोतील रुग्णसेवा मंडळ मोफत वैद्यकीय साहित्य पुरवण्याचे काम गेल्या चार वर्षांपासून करत आहे. आतापर्यंत सुमारे शेकडो लोकांनी या उपकरणांचा लाभ घेतला आहे.
बँक, विमा कंपन्यांतून निवृत्त झालेल्या एक विचाराच्या 11 लोकांनी एकत्र येऊन ही रुग्णसेवा मंडळाची स्थापना केलेली आहे. सेमी फाउलर बेड, साइड रेलिंग, एअर बेड, वॉटर बेड, व्हीलचेअर, वॉकर, कमोड चेअर, बेड पॅन, वॉकिंग स्टिक, बॅक रेस्ट, नेब्युलायझर, सक्शन मशीन, ऑक्सिजन कॉन्संट्रेटर यासह इतर साहित्य रुग्णसेवा मंडळ गरजू रुग्णांना देते. आतापर्यंत शेकडो लोकांनी या उपकरणांचा लाभ घेतला आहे. ज्यांना साहित्याची गरज आहे त्यांनी संपर्क साधावा, असं रुग्णसेवा मंडळचे अध्यक्ष सुरेश देशमुख यांनी सांगितले.
माझ्या कुटुंबीयातील व्यक्तीला या रुग्णसेवा मंडळाच्या उपक्रमाचा लाभ झाला आहे. आम्ही अडचणीत असताना या रुग्णसेवा मंडळांने आम्हाला मोफत साहित्य देऊन मोठी मदत केली. यामुळे आम्ही संकटातून बाहेर निघालो, असं लाभार्थी सुनील देशपांडे यांनी सांगितले.
कुठे आहे रुग्णसेवा मंडळ?
औरंगाबाद शहरातील छत्रपती महाविद्यालयाच्या रोडवरती सांजवार्ता कार्यालयाच्या समोर यंत्र भागामध्ये टेनिस कोर्ट ग्राउंड वर या रुग्णसेवा मंडळाच्या कार्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. या ठिकाणी येऊन तुम्ही हे साहित्य घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
+919423177825
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Aurangabad News, Health, Local18