सुशील राऊत,प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर, 11 मार्च : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत गेल्या 2 वर्षांपासून रखडलेली नोकरभरतीची प्रक्रिया अखेर मार्गी लागली आहे. पहिल्या टप्प्यात अनुकंपा भरतीला सुरुवात झाली आहे. यासाठी महानगरपालिका प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी अनुकंपा तत्त्वावरील गट क व ड संवर्गातील एकूण 64 उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या अनुषंगाने उमेदवारांना बोलावून त्यांचा कल जाणून घेतला.
छत्रपती संभाजीनगर शहराचा विस्तार होत आहे. यामुळे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, महापालिकेतील कर्मचाऱ्यांची संख्या तेवढीच असल्यामुळे कामाचा भार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या 2 वर्षांपासून महानगरपालिकेची नोकर भरती रखडली होती. ही नोकर भरती आता पुन्हा सुरू झाली आहे. यात लिपिक-टंकलेखक 18, लेखा लिपिक-05, वाहन चालक-01, शिपाई-21, स्मशानभूमी रक्षक-01, सफाई कामगार 18 यांचा समावेश आहे. महानगरपालिकेच्या विविध झोन कार्यालय व विभागात विशेषता लेखा विभागातील मनुष्यबळाचा प्रश्न यामुळे मार्गी लागणार आहे अशी माहिती आस्थापना विभागातून देण्यात आली आहे.
उमेदवारांना लवकरच पदस्थापनेचा आदेश
महानगरपालिकेतर्फे अनुकंपा तत्वावरील 64 उमेदवारांचा कल जाणून घेण्यात आला. त्यांच्या समूपदेशनानंतर आवश्यक विभागांमध्ये पदस्थापना देण्यात येणार आहे. दरम्यान महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार अनुकंपावरील 64 उमेदवारांना नियुक्ती व पदस्थापनेचे आदेश निर्गमित केले जाणार आहेत.
ग्रॅज्युएट उमेदवारांनो, 'या' विद्यापीठात नोकरीची मोठी संधी; अर्जाला अवघे 2 दिवस शिल्लक; करा अप्लाय
3 हजार कर्मचारी कंत्राटी
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत अनेक वर्षांपासून भरती झाली नाही. यामुळे बहुतांश विभागात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरोशावर काम सुरू आहे. महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या साफसफाई व पाणीपुरवठा विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची अत्यंत गरज आहे. मात्र, महानगरपालिकेकडे स्वतःची यंत्रणा नाही यामुळे कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या बरोबर अनेक विभाग सुरू आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरोशावर अनेक महत्त्वाची कामे देता येत नसल्यामुळे महापालिकेच्या कामाची गती संथ झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.