औरंगाबाद, 20 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या (Gudhi Padwa) दिवशी मुंबईत जाहीर सभा घेत मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यासोबतच महाविकास आघाडी सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर राज ठाकरेंनी ठाण्यातील सभेतून 3 मे पर्यंतचा अल्टिमेटमच दिला आहे. 3 मे पर्यंत जर भोंग्यांच्या संदर्भात निर्णय झाला नाही तर जशास तसे उत्तर देण्याचं म्हटलं. त्यासोबतच 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी औरंगाबादेत जाहीर सभेचं (Raj Thackeray Rally in Aurangabad) आयोजन केलं आहे. पण या सभेला आता मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे.
राजकीय पक्षांसोबतच विविध संघटनांचा विरोध
1 मे रोजी होणाऱ्या सभेसाठी मनसेकडून जोरदार तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. सभेच्या परवानगीसाठी पोलिसांकडे परवानगी सुद्धा मागितली आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी होणाऱ्या औरंगाबाद येथील सभेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग, ऑल इंडिया पँथर सेना, वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष आणि GAC संघटनांनी विरोध दर्शवला आहे.
शहरातील एकता आणि शांती भंग होऊ शकते असं सांगत राज ठाकरेंच्या सभेला कडाडून विरोध होताना दिसत आहे. आता या संदर्भात औरंगाबाद पोलीस काय निर्णय घेतात हे पहावं लागेल. सभेला परवानगी मिळणार की नाही हे आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
बच्चू कडू यांच्या प्रहारकडूनही विरोध
प्रहार जनशक्ती पक्षाकडून पोलिसांना एक पत्र पाठवण्यात आले आहे. त्यात म्हटले, गेल्या काही दिवसांपासून राज्यात भोंग्यावरुन राजकारण सुरू असून मशिदी बाहेर लाऊड स्पीकर वरुन स्पीकर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा म्हणण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे. एवढेच नाही तर वेळप्रसंगी शस्त्र हाती घेण्याचीही भाषा केली आहे. राजकीय स्वार्थापोटी, राजकीय नेत्यांनी जातीय तेढ निर्माण करणाऱ्या भूमिका घेऊन जनतेस वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जातीय, धार्मिक तेढ निर्माण केल्यामुळे सामाजिक शांतता भंग होऊन देशाची एकात्मता व अखंडता धोक्यात येण्याची शक्यता आहे.
3 तारखेपर्यंत जर त्यांना समजलं नाही तर...
राज ठाकरेंनी रविवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हटलं, हा विषय वर्षांपासून तसाच राहीलेला आहे. मला असं वाटतं की, तुम्ही जर पाच वेळा भोंगे लावणार असाल दिवसातून पाच वेळा आम्ही मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू. देशभरातील माझ्या सर्व हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की, तयारीत रहा. 3 तारखेला.. आता त्यांचा रमजान सुरू आहे. परंतू 3 तारखेपर्यंत जर त्यांना समजलं नाही, कळालं नाही आणि या देशातील कायदा, न्यायव्यवस्थेपेक्षा स्वत:चा धर्म, लाऊडस्पीकर यांना मोठा वाटत असेल तर मला असं वाटतं जशास तसं उत्तर देणं तितकंच गरजेचं आणि आवश्यक आहे.
आमची तयारी सुरू आहे...
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणून आमची तयारी सुरू आहे. महाराष्ट्रात किंवा देशात आम्हाला कोणत्याही प्रकारच्या दंगली, हाणामारी नकोयत. देशातील शांतता भंग करण्याची आमची इच्छा नाहीये. माणुसकीच्या नाताने मला असं वाटतं की, मुस्लिम धर्मियांनी या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. त्यांच्या प्रार्थनेला कुणीही विरोध केलाला नाहीये. त्यांना वाटत असेल की लाऊडस्पीकर वरुनच आम्ही ऐकवणार आहोत तर मग आमच्या देखील आरत्या त्यांना लाऊडस्पीकर वरुण ऐकाव्या लागतील असंही राज ठाकरे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, MNS, Raj Thackeray