औरंगाबाद, 15 डिसेंबर: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण (Omicron variant cases) झपाट्याने वाढत आहेत. भविष्यातील धोका लक्षात घेऊन प्रशासनाकडून कठोर पावलं उचलली जात आहेत. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण (Corona vaccination) केलं जात आहे. तसेच जे लस घेत नाहीत, अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात आहे. एकीकडे प्रशासन लसीकरणासाठी अथक प्रयत्न करत असताना, औरंगाबादमध्ये (Aurangabad) मात्र काही जणांनी लस न घेताही लसीकरण झाल्याचं प्रमाणपत्र देण्याचा गोरख धंदा सुरू केला आहे.
या धक्कादायक प्रकराची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सरकारी आणि खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांसह चौघांना ताब्यात घेतलं आहे. संबंधित आरोपी गरजू लोकांकडून 500 ते 2000 रुपये घेऊन लसीकरणाचं बनावट प्रमाणपत्र देत होते. त्यावर नरेंद्र मोदी यांचा फोटो देखील लावण्यात येत होता. सरकारी डॉक्टरला हाताशी धरून हा गैरप्रकार सुरू होता. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा-Explainer : ओमिक्रॉन विषाणूमुळे भारतात तिसरी लाट येऊ शकते का?
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरातील प्लस रुग्णालयातून हा लसीकरणाचा काळाबाजार सुरू होता. प्लस रुग्णालयातील डॉक्टर राहिमोद्दीन हे गरजू लोकांचे आधारकार्ड आणि मोबाईल नंबर घेऊन शिवूर येथील सरकारी डॉक्टर शेख मोहिनोद्दीन यांना पाठवत असतं. डॉक्टर मोहिनोद्दीन हे आपल्या मर्जीतील एका नर्सला ही माहिती व्हाट्सअॅपवर पाठवत असतं. त्यानंतर संबंधित नर्स आधार क्रमांक आणि मोबाईल नंबरचा वापर करून न घेतलेल्या लसीचा बॅच नंबर टाकून ऑनलाइन रजिस्ट्रेशन करत असे. त्यानंतर, सर्टिफिकेट जनरेट झालं की ते मोबाईलवर पाठवले जात असतं.
हेही वाचा-'Omicron इतर वेरिएंटच्या तुलनेत वेगाने पसरतो आहे', WHO कडून खबरदारीचा इशारा
पण पोलिसांना या गैरप्रकाराचा सुगावा लागल्यानंतर, पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून संबंधित रंगेहाथ अटक केली आहे. यामध्ये एका सरकारी डॉक्टरसह चार जणांना ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे यापूर्वी औरंगाबादेत कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर बनावट रुग्णाला कोविड सेंटरमध्ये उपचार घेण्यासाठी पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यासाठी रुग्णाला दहा हजार रुपये देण्यात आले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Crime news