औरंगाबाद, 07 जानेवारी: गेल्या काही वर्षात सोशल मीडिया (Social media) वापराच्या बाबतीत तरुणाईचा कल प्रचंड वाढला आहे. त्यामुळे जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात बसून कुणाशीही संवाद साधणं अगदी सोपं झालं आहे. अशात सोशल मीडियावरून होणाऱ्या फसवणुकीचं प्रमाण देखील वाढलं आहे. अशीच एक घटना औरंगाबादमध्ये (Aurangabad) घडली आहे. इन्स्टाग्रामवरील अनोळखी तरुणाशी ओळख करणं एका तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. संबंधित तरुणाने पीडित तरुणीचे फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी (posted obscene morphed photos on instagram) केली आहे.
तसेच बदनामी रोखायची असेल तर दोन लाख रुपये दे, (Demand 2 lakh) अशी मागणी आरोपीनं पीडितेकडे केली आहे. यानंतर पीडित तरुणीने सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला आहे. हा प्रकार कळताच पीडित तरुणीच्या वडिलांनी तातडीने सीटी चौक पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी इन्स्टाग्रामवरील arbazz_007 नावाच्या प्रोफाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे?
औरंगाबाद येथील सीटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या मुलीची एप्रिल 2019 मध्ये इन्स्टाग्रामवर एका तरुणाशी ओळख झाली होती. त्यानंतर पुढे संवाद वाढत गेल्यानंतर, आरोपीनं पीडित मुलीचा विश्वास संपादन केला. ओळख वाढवून तिच्या नातेवाईकांचे मोबाइल नंबर गोड बोलून घेतले. तसेच तिला फोटो पाठवायला भाग पाडलं. यानंतर आरोपीनं संबंधित फोटो अश्लील पद्धतीने एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केले.
नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडित मुलीचा मोबाइल हॅक करत सर्व डेटा चोरला. तसेच 'सोशल मीडियावर होणारी बदनामी थांबवायची असेल तर दोन लाख रुपये दे' अशी मागणी आरोपीनं केली. यानंतर घाबरलेल्या तरुणीने सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सीटी पोलिसांनी इन्स्टाग्रामवरील arbazz_007 नावाच्या प्रोफाईलविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cyber crime, Instagram