औरंगाबाद, 11 डिसेंबर : मुंबईत ओमायक्रॉनच्या (Omicron) रुग्णांच्या संख्येत वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सभा, रॅलीला परवानगी नाकारली आहे. 12 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मोर्चे, रॅली, आंदोलन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, असे असतानाही एमआयएमने (MIM) आक्रमक पवित्रा घेत रॅली काढणारच असा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी औरंगाबाद (Aurangabad)हून सकाळी सात वाजता खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्यासह कार्यकर्ते मुंबईच्या (Mumbai) दिशेने रवाना झाले आहेत.
मुंबई येथे आयोजित एमआयएमच्या तिरंगा रॅली (Tiranga Rally)साठी औरंगाबाद येथून सकाळी गाड्या रवाना झाल्या. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे स्वतः गाडी चालवत मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुंबई येथे आयोजित तिरंगा रॅली होणारच असल्याचा दावा जलील यांनी पुन्हा केला आहे. चांदीवली येथे रॅली नंतर सभा घेण्याची परवानगी सुद्धा मिळाल्याचा दावा जलील यांनी केला आहे.
गाड्यांना तिरंगा लावून मुंबईमध्ये प्रवेश करू नये असे विचित्र बंधन घातले असले तरी मुंबई आमची आहे आणि तिरंगा आमच्या पक्षाचा नाही तरी देशाचा झेंडा आहे तो आम्ही लावूनच जाणार अशीही प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.
वाचा : महापौर पेडणेकरांना धमकी पत्राची गृहमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल, पोलिसांना दिले थेट आदेश
चांदिवलीत होणार सभा
मुंबईतील चांदिवली येथील शाळेच्या ग्राऊंडवर सभा होणार आहे. या रॅलीच्या संदर्भात आम्ही रितसर परवानगी पोलिसांकडून घेतली आहे. जेव्हा जेव्हा आम्ही रॅली घेणार असं जाहीर केलं तेव्हा तेव्हा राजकारण होत रॅलीला परवानगी नाकारली गेलीय. त्यामुळे यावेळी आम्ही या रॅलीबाबत आधीच जाहीर केलेलं नव्हतं असंही खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.
रॅलीचा उद्देश काय?
मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे यासोबतच वक्फ बोर्डाच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी एमआयएमने आज रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीला तिरंगा रॅली असे नाव देण्यात आले असून त्यासाठी औरंगाबादहून शेकडो गाड्या तिरंगा ध्वज लावून मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी मुंबईत सभेला संबोधित करणार आहेत.
काय आहे मुंबई पोलिसांचा आदेश ?
मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून कडक नियम लागू करण्यात आले आहे. मुंबईमध्ये पुढील 12 तारखेपर्यंत शहरात रॅली, मोर्चे किंवा कोणतेही आंदोलन करता येणार नाही, असे आदेश मुंबई पोलिसांनी जारी केले आहे.
मालेगाव, अमरावती हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहे. मुंबईत शुक्रवारी रात्रीपासून 12 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मोर्चा, रॅली किंवा कोणत्याही आंदोलनाला परवानगी नसणार आहे. याबद्दल मुंबई पोलिसांनी नवे आदेश जारी केले आहे. पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात अमरावती, नांदेडमध्ये झालेल्या हिसाचाराचाही संदर्भ देण्यात आला आहे. त्याचबरोबर कोव्हिडचा नवा व्हेरिएन्ट ओमायक्रॉन पसरत असल्याने काळजी म्हणून रॅली, आंदोलन आणि संभांना परवानगी नसल्याचं मुंबई पोलिसांकडून आदेशात म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Asaduddin owaisi, MIM, Mumbai, Mumbai police