औरंगाबाद, 20 जानेवारी : औरंगाबादमधून मोठी बातमी समोर येत आहे. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ऑनलाईन ॲपद्वारे आधी ग्राहकांना पैसे द्यायचे आणि त्यानंतर पैसे वसुलीच्या नावाखाली त्यांची फसवणूक करायची असा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता. पैसे दिल्यानंतर पैसे वसुलीचा तगादा लावने, कर्जदाराला शिवीगाळ करणे, धमक्या देणे, सोशल मीडियावर कर्जदारांचे फोटो मार्फ करून आरोपी सोशल मीडियावर व्हायरल करत होते. यामध्ये सर्वाधिक फसवणूक ही उत्तराखंड राज्यातील नागरिकांची करण्यात आली होती. अखेर डेहराडून पोलिसांनी औरंगाबाच्या या कॉलसेंटवर छापा टाकत एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
औरंगाबादमध्ये 'जामतारा' मॉडेल
नागरिकांना आधी ॲपद्वारे कर्ज द्यायचे त्यानंतर कर्जवसुलीच्या नावाखाली त्यांची फसवणूक करायची असा प्रकार राज्यासह देशभरात सुरू आहे. ऑनलाइन फसवणुकीसाठी देशभर बदनाम असलेल्या झारखंड राज्यातील "जामतारा येथील मॉडेलनुसार हे काम सुरू होते. यासाठी आरोपींनी औरंगाबादमध्ये एक कॉलसेंटर सुरू केले होते. या कॉलसेंटवर डेहराडून पोलिसांनी छापा टाकत हे कॉलसेंटर उद्ध्वस्त केले आहे. घटनास्थळावरून मोठ्याप्रमाणात साहित्य जप्त करण्यात आलं आहे.
1 हजारांपेक्षा अधिक मोबाईल जप्त
औरंगाबाद शहरातील पैठण गेट परिसरात हे कॉलसेंटर सुरू होतं. पोलिसांनी या कॉलसेंटवर छापा टाकत घटनास्थळावरून 1 हजारांपेक्षा अधिक मोबाईल जप्त केले आहेत, सोबत दोन तलवारी देखील जप्त करण्यात आल्या आहेत. या कॉलसेंटरचं काम तीन शिफ्टमध्ये सुरू होतं. या कॉलसेंटरमध्ये 200 पेक्षा अधिक तरुण काम करत असल्याचं समोर आलं आहे. जेव्हा पोलिसांनी छापा टाकला तेव्हा हे तरुण कर्जदारांना शिवीगाळ करताना आढळून आले आहेत. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Aurangabad News, Crime, Online fraud