Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

एक वेळ जेवण, 16 तास अभ्यास; चप्पल शिवणाऱ्याच्या पोरीनं करुन दाखवलं! झाली CA

एक वेळ जेवण, 16 तास अभ्यास; चप्पल शिवणाऱ्याच्या पोरीनं करुन दाखवलं! झाली CA

एक वेळ जेवण करत, 16 तास सतत अभ्यास करून तरुणीने यशाला गवसणी घालत सीएची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

एक वेळ जेवण करत, 16 तास सतत अभ्यास करून तरुणीने यशाला गवसणी घालत सीएची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

एक वेळ जेवण करत, 16 तास सतत अभ्यास करून तरुणीने यशाला गवसणी घालत सीएची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

अविनाश कानडजे, प्रतिनिधी

औरंगाबाद, 24 जानेवारी : आईने दुसऱ्याच्या घरी पोळ्या लाटल्या तर वडिलांनी चप्पल-बूट शिवून आपल्या मुलीला वाढविले. याच आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून औरंगाबादमधील एका तरुणीने यशाला गवसणी घालत अत्यंत कठीण अशा "सीए"ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. परिस्थिती माणसाला लढायला शिकवते आणि त्यातूनच संघर्ष करत आपलं ध्येय प्राप्त करता येते, असे म्हटले जाते. औरंगाबादच्या कोमल इंगोलेने याचा प्रत्यय आणून दिला आहे.

घरची परिस्थिती अतिशय नाजूक असताना आईने आणि वडिलांच्या दिलेल्या हिमतीच्या बळावर तिने सीएची परीक्षा उत्तीर्ण केली. एक वेळ जेवण करत, 16 तास सतत अभ्यास करून तीने हे ध्येय प्राप्त केले आहे. तर आता तिला नोकरी करून पुढील शिक्षण पूर्ण करायचे आहे आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे.

कोमलचा आतापर्यंतचा जीवनप्रवास -

कोमलच्या जीवनात तिचं प्रेरणा स्तोत्र तिची आई ठरली. मुलांना उच्चशिक्षित करायचं ही जिद्द आईची होती आणि त्यासाठी ती काही करायला तयार होती. तेच बघून कोमलला अभ्यास करण्याचा हुरूप येत होता. आठवीपर्यंत मराठी शाळेत शिकल्यानंतर, नवोदयची परीक्षा देऊन तिने सीबीएससी अभ्यासक्रमाचे शिक्षण प्राप्त करायला सुरुवात केली.

देशात कॉमर्स अभ्यासक्रमात अग्रगण्य असणाऱ्या नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक येथे प्रवेश मिळवला. घरची परिस्थिती बेताची असल्याने महिन्याला 500 रुपये खर्चासाठी मिळत होते. त्यात रोज 20 रुपये प्रवासाला लागत असल्याने तिने अपार कष्ट करत कधी पायी प्रवास केला. महाविद्यालय आणि क्लासेस मध्ये जाताना लागणारा वेळ पाहता हॉस्टेलला जाऊन दुपारचे जेवण करणे शक्य नव्हते. अडीच वर्ष तिने बहुतांश दिवस आपलं दुपारचं जेवण केले नाही. समोर ध्येय फक्त अभ्यास हेच ठेवून, रोज 16 तास अभ्यास करून तिने आपली तयारी पूर्ण केली आणि तिच्या मेहनतीचे फळ म्हणून ती सीएची परीक्षा उत्तीर्ण झाली. या यशाचे पूर्ण श्रेय ती आपल्या आईला देते.

कोमल हुशार असल्याने आपल्या मुलीचे शिक्षण इंग्रजी शाळेत व्हावे, असे आईला वाटत होते. त्यामुळे तिला घेऊन ती लहानपणी इंग्रजी शाळेत गेली. मात्र, त्यावेळेस आई वडील पदवीधर असले, तरच मुलांना इंग्रजी शिक्षण दिले जाईल, असे सांगण्यात आलं. त्यामुळे आपल्याप्रमाणे आपल्या मुलीलाही आता शिक्षणासाठी झगडावे लागेल, हे आईला कळालं होतं. मात्र, कोमलने जिद्द ठेवत आईच्या स्वप्नपूर्ती कडे प्रवास सुरू केला होता.

ते बघून आईनेदेखील तिच्यासाठी कष्ट करायला सुरुवात केली. मुंबईमध्ये राहून मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेणे, चांगल्या कोचिंग क्लासमध्ये अभ्यास पूर्ण करणं हे परिस्थितीला झेपण्यासारखे नव्हते. मात्र, आईने आठ तास कंपनीत काम करत, घरी आल्यावर इतरांचे कपडे शिवण्याचे काम केले. इतकंच नाही तर फावल्या वेळात समारंभाच्या ठिकाणी पोळ्या करून देण्याचेही काम केले आणि मुलीसाठी शिक्षणासाठी पैशाची पायाभरणी तिने केली.

हेही वाचा - गायक होण्याचं स्वप्न पाहणारे डॉ. हरिओम झाले IAS, कसा होता हा प्रवास?

सुरुवातीला मुलीला हॉस्टेलमध्ये जागा मिळत नसल्याचे पाहून, मुंबई येथे मोठ्या शासकीय अधिकाऱ्यांच्या दालनाची उंबरे तिने झिझवली. आज तिच्या कष्टाचे फळ मिळाले असल्याने आता आपण खूप खुश आहोत, असे कोमलच्या आई विजयमाला इंगोले यांनी सांगितले.

वडिलांनीही केला संघर्ष -

कोमलचे वडील मुंजाजी इंगोले यांचे सातारा परिसरात चप्पल - बूट विक्रीचा छोटसे दुकान आहे. आधी व्यवसाय ठीकठाक चालत होता. मात्र, व्यवसायात चढ-उतार आल्याने परिस्थिती बेताची झाली. त्यामुळे त्यांनी चप्पल बूट शिवायला सुरुवात केली. घरी दोन मुले, एक मुलगी त्यात हातावर पोट असल्याने त्यांना अन्न, वस्त्र, निवारा इतकच देणे त्यांना शक्य झाले. मात्र, त्या परिस्थितीवर मात करत त्यांची मुलगी कोमलने सीएची परीक्षा उत्तीर्ण केली. ती परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा ऐकल्यावर पूर्ण आयुष्य डोळ्यासमोरून गेले. आता मात्र उजेडाकडे आलो आहे, असे वाटत असल्याचे कोमलचे वडील मुंजाजी इंगोले यांनी सांगितले.

आता कोमलला घराची आर्थिक स्थिती चांगली करायची आहे. इतकेच नाही तर नोकरी करत, आपले एमबीएदेखील पूर्ण करायचे आहे. आयुष्यात पुन्हा आई-वडिलांना असे कष्ट करण्याची वेळ येऊ नये, त्यासाठी ती आता सज्ज झाली आहे. कोमलचा हा प्रवास इतरांसाठी नक्की प्रेरणादायी आहे.

First published:

Tags: Aurangabad News, Career, Success story