औरंगाबाद, 18 जानेवारी : सकाळी शाळेच्या आसपास गेल्यानंतर हमखास राष्ट्रगीताचे बोल कानी पडतात. मात्र, तुम्ही औरंगाबाद शहरातील सिद्धार्थ उद्यानाच्या परिसरामध्ये असाल तर तुम्हाला राष्ट्रगीताचा आवाज कानावर पडू शकतो. सिद्धार्थ उद्यानात मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीने सकाळी नियमित राष्ट्रगीत गायलं जातं. यावेळी या ठिकाणी अनेक नागरिक उपस्थित असतात. कारण यातून सर्वांमध्ये राष्ट्रभक्तीची प्रेरणा निर्माण हाेते, असं नागरिक सांगतात.
औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती भागामध्ये सिद्धार्थ उद्यान आहे. शहरातील हे उद्यान सर्वात जुने आणि मोठे उद्यान म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी शहरातील विविध भागातील नागरिक मॉर्निंग वॉकसाठी पहाटे 5 पासून सकाळी 9 वाजेपर्यंत येत असतात. यामध्ये लहानांपासून मोठ्यांचा समावेश असतो. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी मॉर्निंग वॉक या नावाने एक ग्रुप तयार केला. या ग्रुप मार्फत वेगववेगळे उपक्रम राबवले जातात. यामध्येच ग्रुप मधील सदस्य अॅडव्होकेट जाधव यांना राष्ट्रगीत गायची संकल्पना सुचली. त्यावेळेस त्यांनी प्रत्येकाला ही संकल्पना सांगितल्यानंतर प्रत्येकाला ती आवडली. आणि त्यानंतर नियमित राष्ट्रगीत गायला सुरुवात झाली.
सिद्धार्थ उद्यानातील हुतात्मा स्मारकासमोर नागरिक जमतात आणि 7 वाजून 15 मिनिटांनी येथे राष्ट्रगीताला सुरुवात होते. सिद्धार्थ उद्यानामध्ये मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या ज्या नागरिकांच्या कानावरती राष्ट्रगीताचे बोल पडतात ते नागरिक त्याच ठिकाणी स्तब्ध होऊन राष्ट्रगीताला सुरुवात करतात. या राष्ट्रगीतासाठी 18 ते 80 वयोगटातील नागरिक सहभागी होतात, असं ग्रुपचे सदस्य अॅडव्होकेट जाधव सांगतात.
राष्ट्रभक्तीची प्रेरणा निर्माण हाेते
मी नेहमी मॉर्निंग वॉकसाठी सिद्धार्थ उद्यानात येते. या ठिकाणी 7 वाजून 15 मिनिटांनी राष्ट्रगीत दररोज गायले जाते. यातून सर्वांमध्ये राष्ट्रभक्तीची प्रेरणा निर्माण हाेते, असे सहभागी डॉ.चंद्रकला जोशी यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Local18