औरंगाबाद, 25 जून : शिवसेनेचे जवळपास 40 बंडखोर आमदार गुवाहाटीला गेले आहेत. त्यांच्याकडून महाविकास आघाडी सरकार कोसळ्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीवर संकट कोसळलं आहे. पण आता दोन्ही बाजूने आता लढाई सुरु झाली आहे. महाविकास आघाडी सरकारकडून बंडखोर आमदारांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तर आमदारांनी कोर्टात जाण्याचं प्रत्युत्तर दिलं आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान गुवाहाटीतून बंडखोर आमदारांच्या गोटातून एक आमदार औरंगाबादमध्ये दाखल होणार आहे. हे आमदार म्हणजे अब्दूल सत्तार!
सिल्लोडमध्ये उद्या अब्दूल सत्तार आणि एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ मोठ्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार आणि त्यांचे कार्यकर्ते आज सकाळपासून रॅलीला मोठ्या संख्येत नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत. अब्दूल सत्तार स्वत: या रॅलीसाठी सिल्लोडला येणार आहेत आणि या रॅलीचं नेतृत्व करणार, अशी माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.
(शिवसेनेला मोठा झटका, नरेश म्हस्केंचा ठाणे जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा)
अब्दूल सत्तार हेलिकॉप्टरने येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून पोलिसांकडे हेलिपॅडसाठी परवानगी मागितली जणार आहे. पण अब्दूल सत्तार यांना चार्टेड विमानाशिवाय पर्याय नाही. ते येणार असतील तर त्यांची रॅली निश्चितच मोठी होऊ शकते. दरम्यान, अब्दूल सत्तार यांना त्यांचे गटनेते एकनाथ शिंदे यांची परवानगी मिळाली आहे का? याबाबतची माहिती मिळालेली नाही. याशिवाय या रॅलीत गर्दी जमावी यासाठी सत्तार येणार असल्याची माहिती मुद्दामून पसरवण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गुवाहाटीतल्या आमदारांचा मुक्काम वाढला
गुवाहाटीमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा गुवाहाटीमधील मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीत ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत त्या आमदारांच्या खोल्यांचे बुकिंग 30 तारखेपर्यंत वाढवण्यात आलं आहे. कायदेशीर लढाई, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यावर अविश्वास ठराव, भाजपसोबत चर्चा याला वेळ लागणार असल्याने बंडखोर आमदार गुवाहाटीमध्येच थांबणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.