औरंगाबाद, 18 जून : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांच्यावरील आरोप प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. शेख यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीने थेट घुमजाव केला आहे. त्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण इथे थांबलेलं नाही, तर या प्रकरणी आरोप करणाऱ्या तरुणीने भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्याविरोधात तक्रार केली आहे. तरुणीच्या या तक्रारीमुळे चित्रा वाघ आणि भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्या विरोधात औरंगाबादच्या जीन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत वृत्त 'एबीपी माझा'ने दिलं आहे.
या प्रकरणावर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "राजकारणात काम करताना अशा घटना किंवा अनुभव नवीन नाहीत. आम्ही त्या मुलीला पहिल्या दिवसापासून मदतच केली आहे. आम्हाला जिथे-जिथे तपास यंत्रणा बोलवतील तिथे आम्ही जावू आणि सहकार्य करु. असे काही अनुभव येतात म्हणून आम्ही काम करणं सोडत नाहीत. आम्ही काम करतच राहू. आम्हाला पूर्ण कल्पना आहे, ज्या ठिकाणी अशी राजकीय धींड येतात त्या ठिकाणी अशा अडचणी उद्भवणं स्वाभाविक आहे. त्यामुळे अशा अडचणींना सामोरे जाण्यास आमची तयारी आहे", असं चित्रा वाघ म्हणाल्या.
(राणा दाम्पत्याच्या घरी पोलीस दाखल, घडामोडींना प्रचंड वेग)
काही महिन्यांपूर्वी मेहबूब शेख यांच्यावर एका तरुणीने बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या प्रकऱणी 28 डिसेंबर 2020 रोजी औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण या प्रकरणातील पीडितेने घुमजाव केला आहे. चित्रा वाघ यांनीच आपल्याला महेबूब शेख यांच्याविरोधात खोटी बलात्काराची तक्रार द्यायला लावली होती, असा खळबळजनक आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणात सुरेश धस यांचा देखील सहभाग असल्याचा दावा पीडितेने केला आहे. चित्रा वाघ यांनी मीडियाशी कसं बोलायचं ते शिकवलं तर सुरेश धस यांनी जे लिहून दिलं ते मीडियासमोर बोलायला सांगितलं, असे गंभीर आरोप पीडितेने केले आहेत.
विशेष म्हणजे चित्रा वाघ यांच्याशी संबंधित हे पहिलं प्रकरण नाही. याआधी देखील चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पण काही दिवसांनी या प्रकरणातील पीडितेनेच चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप करत तक्रार केली होती. "गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीने मला डांबून ठेवले होते. एवढंच नाहीतर पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला चित्रा वाघ यांनी भाग पाडले होते. चित्रा वाघ यांनी सादर केलेले मेसेजचे पुरावे खोटे आहे, विशिष्ट यंत्रणा वापरुन माझ्या मोबाईलवरुन कुचिक यांना आणि कुचिक यांच्या मोबाईल वरुन मला मेसेज येत आहेत", असा गौप्यस्फोट त्यावेळी पीडितेने केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.