औरंगाबाद,17 जानेवारी : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये भिन्न संस्कृतीचे लोकं एकत्र राहतात. या संस्कृतीचा ठसा शहरातील खाद्यपदार्थांवरही उमटला आहे. औरंगाबादमध्ये खव्याची जिलेबी हा स्पेशल पदार्थ गेल्या 30 वर्षांपासून खवय्यांना भुरळ घालतोय. हा पदार्थ काय आहे ते पाहूया
काय आहे खासियत?
औरंगाबाद शहरातील चेरिपुरा भागामधील रहिवासी मोहम्मद इस्माईल यांनी 30 वर्षांपूर्वी औरंगाबाद शहरामध्ये विशेष पदार्थ आणण्याचं ठरवलं. त्यानंतर त्यांनी स्पेशल खव्याची जिलेबी हा पदार्थ सुरू केला. इस्माईल यांची तिसरी पिढी आता या दुकानात काम करते, पण येथील चव 30 वर्षांपासून तशीच आहे. औरंगाबाद शहराच्या कानाकोपऱ्यातील नागरिक ही जिलेबी आणि त्यासोबत भजी खाण्यासाठी इथं येतात.
या स्पेशल जिलेबीबद्दल माहिती सांगताना मोहम्मद जावेद म्हणाले की, 'जिलेबी बनवण्यासाठी आम्ही विशेष पद्धतीचा खवा, दूध, साखर आणि डालडा याचा वापर करतो. आमची जिलेबी बनवण्याची खास पद्धत आहे. त्यामुळे ही अधिक चवदार लागते. या जिलेबीसोबत आम्ही तयार केलेले स्पेशल भजे खाण्याची मजा काही औरच आहे. खव्याच्या जिलेबीची किंमत 280 रूपये प्रती किलो तर साधी जिलेबी 140 रुपये प्रती किलो मिळते. भज्याची किंमत 240 रुपये प्रती किलो आहे.
औरंगाबादची बेस्ट पावभाजी, 25 वर्षांपासून कायम आहे चव! Video
'आम्ही खव्याची जिलेबी सुरू केली त्यावेळी खवा, तेल या साहित्यांचा दर खूप कमी होता. आता हे दर वाढले आहेत. महागाईच्या जमान्यात जिलेबीची चव टिकवण्यासाठी आम्हाला नफ्यात काटकसर करावी लागत आहे. त्यानंतरही आजवर देत असलेली चव भविष्यातही कायम राखू असा आम्हाला विश्वास आहे,' असं जावेद यांनी सांगितलं.
'या ठिकाणी आम्ही गेल्या सात ते आठ वर्षांपासून जिलबी भजी खाण्यासाठी येत असतो या ठिकाणची चव ही कुठेच मिळत नाही,' अशी भावना शेख अफसर या ग्राहकानं व्यक्त केली. तर, आम्ही इथं जिलेबी खाण्यासाठी नेहमी येतोच. त्याचबरोबर नातेवाईकांसाठी जिलेबी भजे पार्सल म्हणूनही नेत असतो. आम्हाला नातेवाईक हे पार्सल आणण्यासाठी नेहमी आग्रह करतात असं मुख्तार शेख यांनी सांगितलं.
कुठे खाणार जिलेबी भजे?
चेरिपुरा भागातील हे दुकान सकाळी दहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू असतं. या ठिकाणी ऑनलाईन डिलिव्हरी देखील उपलब्ध आहे. तुम्ही अधिक माहितीसाठी 9325033895 या क्रमांकावर दुकान मालकाशी संपर्क साधू शकता.
गुगल मॅपवरून साभार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Food, Local18, Local18 food