सुशील राऊत
औरंगाबाद, 02 फेब्रुवारी : फॉक्स क्लूजच्या वतीने देण्यात येणारा इंडिया प्राइम वुमन आयकॉन 2022 पुरस्कार या वेळी अॅड. अनघा पेडगावकर यांना प्रदान करण्यात आला आहे. कमी वयामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. अनघा यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
मूळच्या औरंगाबाद शहरातील अनघा पेडगावकर यांचे शालेय शिक्षण औरंगाबाद शहरामध्येच झाले. त्यांनी पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण एसबीओ शाळेमध्ये घेतले. दहावीमध्ये त्यांना 92 टक्के मिळाल्यानंतरही त्यांनी पुढील शिक्षणासाठी विज्ञान शाखे ऐवजी कला शाखेची निवड केली. याचं कारण होतं की त्यांना भविष्यामध्ये वकिली पेशामध्ये काम करायचं होतं.
बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी औरंगाबाद शहरातील एमपी लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि लॉ शिक्षण पूर्ण केलं. दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी आविष्कार स्पर्धेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलं. आर टी एम युनिव्हर्सिटीचा बेस्ट रिसर्चचा पुरस्कार ही त्यांना मिळालेला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या कार्यालयात त्यांनी प्रशिक्षण घेतलं. सध्या त्या बॉम्बे हायकोर्ट औरंगाबाद बेंचला प्रॅक्टिस करत आहेत.
सामाजिक क्षेत्रात आवड
अनघा यांना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायची आवड आहे. त्यामुळे त्या सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय असतात. या सोबतच त्या महिलांना आणि मुलींना पोक्सो कायद्यासंदर्भात मार्गदर्शनही करतात. या कायद्यासंदर्भात पालक आणि मुला-मुलींमध्ये असलेले समज गैरसमज त्या शाळेमध्ये जाऊन दूर करतात. त्यासोबत आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या महिला, पीडित असलेल्या मुलीं त्यांना मोफत वकिलीची सेवा ही देतात.
त्यामुळे अनघा पेडगावकर यांच्या कामाची दखल घेऊन फॉक्स क्लूजच्या वतीने देण्यात येणारा इंडिया प्राइम वुमन आयकॉन 2022 चा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळवण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागते. त्यानंतर संबंधित फॉक्स क्लूजच्या वतीने वेगवेगळ्या कागदपत्रांची पूर्तता करून व्हेरिफिकेशन होते आणि त्यानंतर हा पुरस्कार दिला जातो.
ऊर्जा देणारा पुरस्कार
भारतामध्ये महत्त्वाचा समजला जाणारा फॉक्स क्लूजच्या वतीने देण्यात येणारा इंडिया प्राइम वुमन आयकॉनचा पुरस्कार मला मिळाल्याबद्दल मला खूप अभिमान वाटत आहे. हा पुरस्कार मला माझ्या कामाची पावती नाही तर भविष्यात मला सामाजिक जबाबदारी राखत काम करण्याची ऊर्जा देणारा पुरस्कार असल्याचे अनघा पेडगावकर यांनी सांगितले.
एक अभिमानाची गोष्ट
अनघा लहानपणापासून शाळेमध्ये हुशार होती. ती प्रत्येक स्पर्धांमध्ये सहभागी होत होती. या सोबतच तिला सामाजिक क्षेत्रातही आवड आहे. ती नेहमी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असते. तिच्या या कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मान होणे हे माझ्यासाठी माझी मुलगी म्हणून एक अभिमानाची गोष्ट आहे. भविष्यात तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असं अनघाची आई स्मिता पेडगावकर यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Local18