वैजापूर, 19 फेब्रुवारी: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील वैजापूर (Vaijapur) याठिकाणी एका शिवसेना आमदाराने आपल्या कुटुंबीयांशी मिळून भावजयीस बेदम मारहाण (Shivsena MLA beat sister in law) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिला आपल्या पतीसह एका नातेवाईकाच्या श्राद्धाच्या कार्यक्रमात गेली होती. यावेळी भर कार्यक्रमात आमदाराने आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पीडितेस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. या मारहाणीत आमदाराची भावजय जखमी झाल्या आहेत. त्याच्या पाठीवर आणि शरीरावर मारहाण केल्याचे व्रण उमटले आहेत. या प्रकरणी आमदारासह 10 जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
रमेश बोरनारे (Ramesh Bornare) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव असून ते शिवसेना आमदार (Shivsena MLA) आहे. त्यांच्यासोबत कुटुंबातील अन्य नऊ जणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, वैजापूर तालुक्यातील सटाणा याठिकाणी गुरुवारी भाजपच्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं होतं. हे उद्घाटन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला आरोपी शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांच्या चुलत भावाची पत्नी जयश्री दिलीप बोरनारे या पतीसह उपस्थित होत्या.
हेही वाचा-पत्नीसह सासरच्यांकडून सुरू होता अमानुष छळ; प्राध्यापकानं केला हृदयद्रावक शेवट
या कार्यक्रमात जयश्री यांनी डॉ. कराड आणि माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी यांचा सत्कार केला होता. विरोधी पक्षातील नेत्याचा सत्कार करणं बोरनारे कुटुंबाच्या जिव्हारी लागलं. याच रागातून बोरनारे कुटुंबीयांनी जयश्री यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. यावेळी आरोपींनी पीडितेला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देखील दिली. या मारहाणीत आमदार रमेश बोरनारे देखील सहभागी झाले होते, असा आरोप पीडित महिलेनं आपल्या तक्रारीत केला आहे. यावेळी आरोपींनी फिर्यादी महिलेच्या पतीला देखील मारहाण केली आहे. हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी वैजापूर येथील गोदावरी कॉलनीत घडला आहे.
हेही वाचा-भलत्याच कारणावरून पती द्यायचा त्रास, पुण्यात 21 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन
भर कार्यक्रमात मारहाण झाल्यानंतर फिर्यादी महिलेनं थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी सर्व प्रथम महिलेला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. उपचार केल्यानंतर पोलिसांनी रीतसर तक्रार लिहून घेतली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्यासह कुटुंबातील दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. एका आमदारानेच आपल्या भावजयीला मारहाण केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Crime news, Mla, Shivsena