सुशील राऊत प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर,10 मार्च : पैठण येथील संत एकनाथ महाराज मंदिराप्रमाणेच छत्रपती संभाजीनगर शहरातील औरंगपुरातील संत एकनाथ महाराज मंदिरात गेल्या 83 वर्षांपासून नाथषष्ठी सोहळा साजरा केला जातो. या सोहळ्याला मराठवाड्यातून वेगवेगळ्या भागातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. दोन वर्षानंतर निर्बंध मुक्त वातावरणात 13 मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या नाथषष्ठी सोहळ्याची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे.
संत एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले औरंगपुरा हे क्षेत्र आहे. संत एकनाथ महाराज ज्यावेळेस त्यांच्या गुरूंचे दर्शन घेण्यासाठी पैठण येथून निघालेले असत त्यावेळेस संत एकनाथ महाराजांचा मुक्काम छत्रपती संभाजीनगर येथील औरंगपुरा भागामध्ये असायचा. आजही मंदिरात असलेल्या मूर्ती त्यावेळेस संत एकनाथ महाराजांनी पूजा केलेल्या मूर्ती आहेत. यामुळे औरंगपुरातील संत एकनाथ महाराजांच्या मंदिरात 400 वर्षांपासून पालखी काढण्याची आणि नाथषष्ठी सोहळ्याला काला प्रसाद वाटपाची परंपरा आहे.
नाथषष्ठी सोहळा साजरा केला जातो
गेल्या 83 वर्षापासून औरंगपुरा येथील संत एकनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये नाथषष्ठी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 1940 पासून या मंदिरामध्ये दहीहंडी काल्याची मोठी परंपरा आहे. हा काला प्रसाद बनवण्यासाठी द्वारकादास पाटील यांनी सुरुवात केली होती. द्वारकादास पाटील यांनी सुरुवातीला झाडाला बांधून दहीहंडी फोडली होती. दहीहंडी काला हा गीताबाई देशमुख यांनी तयार केला होता. त्यानंतर नियमितपणे त्याच काला तयार करत असतं. आता त्यांच्या सुना सविता देशमुख आणि कविता देशमुख यांच्यासह त्याचा परिवार काला बनवण्याची परंपरा जपत आहे. देशमुख कुटुंबाची ही तिसरी पिढी असल्याचे मंदिराचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सदानंद देवे यांनी सांगितले.
कसा बनतो काला?
मंदिरात दिला जाणारा काला प्रसाद बनवण्यासाठी ज्वारीच्या लाह्या चाळून व धुवून घेतल्या जातात. नंतर त्या मोठ्या कपड्यावर पसरवल्या जातात. दह्याला ग्राइंडर मधून पात्र केलं जातं. त्यानंतर त्यामध्ये जिरे, मिरची, धने, कोथिंबीर वाटून मिश्रण करतात. मोठ्या भांड्यामध्ये बारा किलो लाह्यांना ग्राइंडर मधून काढले जाते. चार किलो मसाला एकजीव केला जातो. हे मिश्रण तीन तास ठेवून नंतर दहीहंडी फोडल्यानंतर वाटप केलं जातं, असं मंदिराचे व्यवस्थापक सोमनाथ शेलार यांनी सांगितलं.
काय आहे नाशिकमधील पेशवेकालीन रहाड रंगोत्सवाची परंपरा? पाहा Video
भव्य तयारी
नाथषष्ठी सोहळा साजरा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर परिसरातील सर्व गावातील भाविक मोठ्या संख्येने उत्साहात सहभागी होत असतात. यामुळे या ठिकाणी एक भक्तिमय वातावरण नेहमी बघायला मिळतं. नाथषष्ठी या सोहळ्यानिमित्त भव्य तयारी करण्याला सुरुवात झाली असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी 40 पोते ज्वारीच्या लाह्याचे वाटप काला प्रसाद म्हणून केले जाणार आहे. दोन वर्षानंतर कोरोना निर्बंध मुक्त वातावरणामध्ये साजरा होणारा नाथषष्ठी सोहळ्यामध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळते असंही सदानंद देवे यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.