औरंगाबाद, 25 जानेवारी : देशाच्या स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात 75 हजार नोकर भरती केली जाणार असल्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात केली होती. प्रत्यक्षात अजून एकही पद भरण्यात आलं नाही. अशातच आता पुढील 3 महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावेळी ते म्हणाले की निवडणूक आहे म्हणून घोषणा करत नाही तर 2012 पासून भरती बंद होती ती आम्ही सुरू केली.
सर्वच जिल्ह्याने वाढीव मागण्या केल्या आहेत. जेवढ्या पूर्ण करता येणे शक्य आहे त्या पूर्ण केल्या जातील आचारसंहिता असल्यामुळे त्याची घोषणा करता येणे शक्य नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियोजन आयोगाच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली आहे. औरंगाबाद मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयात नियोजन विभागाची बैठक पार पडली. यावेळी सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हाधिकारी खासदार आमदार उपस्थित होते.
सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या वाढीव मागन्या
बुधवारी सकाळी दहा वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या बैठकीला सुरुवात झाली. यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर तसेच महसूल उपायुक्त पराग सोमण सामान्य प्रशासन उपायुक्त जगदीश मिनियार यासह औरंगाबादचे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांची उपस्थिती होती. बुधवारी साडेचार तास फडणवीस यांनी विभागांचा आढावा घेतला. यामध्ये लोकप्रतिनिधींनी आपल्या जिल्ह्यासाठी वाढीव निधी देण्यात येण्याची मागणी उपमुख्यमंत्राकडे केली तसेच औषधी आरोग्य संदर्भातील विविध प्रश्न यावर चर्चा करत त्यासाठी जास्तीचा निधी देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
वाचा - शिवसेनेतल्या भूकंपानंतर उद्धव पहिल्यांदाच शिंदेंच्या बालेकिल्ल्यात, ठाण्यात ठाकरेंचं शक्तीप्रदर्शन!
नोकरभरतीची जाहिरात जानेवारी महिन्यात प्रसिद्ध न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करू..
शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात 75 हजार पदांच्या नोकर भरतीची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात कुठल्याच भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे 75 हजार पदांची भरती म्हणजे नुसते गाजर असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे. जानेवारी महिन्यात जर भरती प्रक्रिया सुरु झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशारा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने दिला आहे.
स्पर्धा परीक्षार्थींनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात पोलीस शिपाई भरती सोडल्यास वर्ग तीन आणि वर्ग चार पदांच्या भरतीच्या कोणत्याच मोठ्या जाहिराती आलेल्या नाहीत. महाराष्ट्रात एकूण रिक्त पदांची संख्या लाखांच्या जवळपास आहे. 75 हजार पदभरतीची घोषणा करुन तीन ते चार महिने उलटून गेले. मात्र प्रत्यक्षात जाहिरात प्रसिद्ध होत नाही. या विरोधात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ट्विटरवर सुद्धा आपल्या मागण्यांसाठी मोहीम सुरु केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Devendra Fadnavis