औरंगाबाद, 23 जानेवारी : उच्चशिक्षण झाल्यावर स्वत:चा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय सुरू केला. सर्व काही सुरळीत असताना अचानक लॉकडाऊन लागले. या काळात हा व्यवसाय बंद करावा लागला. तब्बल 40 लाखांचं नुकसान झालं. पण, खचून न जाता त्यांनी पुन्हा व्यवसायाला सुरूवात केली. आता त्यांचा वर्षभरात दीड कोटींचा टर्न ओव्हर आहे. औरंगाबादचे नव उद्योजक वीरेंद्र दौड आणि गार्गी दौड या जोडप्याची ही यशोगाथा आहे.
अचानक व्यवसाय बुडाला
वीरेंद्र हे सिल्लोड तालुक्यातल्या पानवडोद बुद्रक गावचे. त्यांचं शालेय आणि उच्च शिक्षण औरंगाबादमध्ये झालं. त्यांच्या पत्नी गार्गी यांनी एमएसस्सीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर वीरेंद्र यांनी 2013 साली स्वत:चा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय सुरळीत सुरू होता. त्यांना वर्षभरात 40 लाखांचं उत्पन्नही होत होतं. पण कोरोना महामारीत त्यांचा व्यवसाय बंद झाला. त्याचं मोठं नुकसान झालं. या काळात कुटुंबानं समजून घेतल्याचं वीरेंद्र सांगतात.
पुन्हा नवी सुरूवात
अवघड परिस्थितीमध्ये खचून न जाता त्याला सामोरं जाण्याचा निर्धार दौड पती-पत्नींनी केला. त्यांनी नवा व्यवसाय करण्याचं ठरवलं. या व्यवसायांचा शोध घेताना आम्हाला खाण्याच्या तेलासंदर्भात माहिती मिळाली. आम्ही याचा अभ्यास करून हा व्यवसाय सुरू केला.
नोकरी न करता निवडला आधुनिक शेतीचा पर्याय, शेवाळ शेतीतून करतोय लाखोंची कमाई!
ऑरगॅनिक लाकडी घाण्यात करडाई, शेंगादाणा, मोहरी, नारळ, सूर्यफूल, बदाम, जवस याचे तेल करण्यास आम्ही सुरू केलं. आम्हाला सुरूवातीला प्रतिसाद नव्हता. त्यामुळे हा व्यवसाय सुरू करून चूक केली नाही ना, असा प्रश्न पडत असे. त्या परिस्थितीमध्येही आम्ही धीर सोडला नाही आणि हळूहळू या व्यवसायात जम बसला.' अशी माहिती दौड यांनी दिलीय.
गुजरात, दिल्लीमध्येही विक्री
'आमचा माल महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, अमरावतीसह गुजरात आणि दिल्लीमध्ये पोहचतो. सातत्यानं मागणीमध्ये वाढ होत असल्यानं आम्हाला आता यंत्रणा वाढवावी लागणार आहे. सध्या आमच्याकडे चार पुरुष आणि पाच महिला काम करतात. आमचा महिन्याला पंधरा लाख तर वर्षाला सहा कोटींचा टर्नओव्हर आहे,' अशी माहिती त्यांनी दिली.
ऑर्गीसत्त्वमध्ये तयार होणार तेल 100 टक्के शुद्ध आणि रसायनमुक्त आहे. नेहमी दुकानात मिळणाऱ्या तेलाच्या तुलनेत याची किंमत दुपटीनं जास्त आहे. पण, हे आरोग्यासाठी उपायकारक तेल आहे. तुम्हाला एरवी पाच लिटर लागणाऱ्या तेलाचं काम इथं तीन लीटरमध्येच भागू शकते.
'नव्यानं सुरू करा'
'आम्हाला 10 हजार ग्राहकांपर्यंत पोहचायचे असून दर महिन्याला एक लाख लिटर तेलाची विक्री करणे आमचा उद्देश आहेत. जास्तीत जास्त जणांना रोजगार देणे आणि विषमुक्त आहाराचं तेल पुरवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असतील, असं रवींद्र दौड यांनी सांगितलं.
लॉकडाऊनचा काळ आमच्यासाठी खूप कठीण होता. त्यावेळी देखील आम्ही भविष्याचा विचार सकारात्मक होतो. आम्हाला आमच्या घरच्यांची साथ मिळाली. आम्ही नव्यानं व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये आम्हाला यशही मिळत आहे. जी मंडळी गेल्या काही काळात अडचणीत सापडली आहेत त्यांनी पुन्हा नव्या जोमानं व्यवसाय सुरू करावा. त्यांना नक्की यश मिळेल, असं गार्गी दौड यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Local18, Success story