सुशील राऊत,प्रतिनिधी
औरंगाबाद, 24 फेब्रुवारी : लग्न समारंभ किंवा घरातील एखाद्या कार्यक्रमात कराव्या लागणाऱ्या सजावटीमध्ये फुलांना मोठं महत्त्व आहे. ताज्या आणि आकर्षक फुलांचा वापर केल्यानंतर ही सजावट अधिक खुलून दिसते. अन्य बाजारपेठांप्रमाणे फुलांच्या बाजारपेठेतही चायनीज फुलांनी आक्रमण केलं आहे. औरंगाबादच्या मार्केटमध्ये सध्या चायनीज फुलांचा ट्रेंड वाढला आहे. त्यामुळे पारंपारिक फुल विक्रेते अडचणीत आले आहेत.
चायनीज धोका
अनेक जीवनाश्यक वस्तूंच्या मार्केटमध्ये चायनीज वस्तूंनी शिरकाव केला आहे. या वस्तूंमुळे हा व्यवसाय करणारे देशी विक्रेते अडचणीत आलेत. फुलांच्या बाजारपेठेतही आता हीच परिस्थिती निर्माण झालीय. सजावटीसाठी लागणाऱ्या नैसर्गिक फुलांची जागा चायनीज फुलांनी घेतली आहे. नैसर्गिक फुलांच्या वाढत्या किंमती तसंच त्यांची टिकून राहण्याची मर्यादा आहे. त्या तुलनेत चायनीज फुलं स्वस्त मिळतात आणि ते जास्त कालावधीसाठी राहातात. त्यामुळे ग्राहक या फुलांना प्राधान्य देत असल्याची माहिती फुल विक्रेत्यांनी दिलीय.
ग्राहकांच्या या मागणीचा परिणाम आता नैसर्गिक फुलांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवरही झाला आहे. त्यांनी विक्रीसाठी आणलेल्या फुलांना तुलनेत कमी मागणी असल्याचं हे शेतकरी सांगतात. याचा थेट फटका या प्रकारच्या शेती करणाऱ्यांना सहन करावा लागत आहे.
वातावरणातल्या बदलांचा आंब्याच्या झाडांना धोका! नुकसान टाळण्यासाठी 'ही' घ्या काळजी, Video
किती आहे फरक?
औरंगाबादच्या बाजारपेठेत कृत्रिम फुलांचे गजरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हे गजरे महिला आवडीनं खरेदी करतात. लग्न समारंभ, तसेच लहान-मोठ्या कार्यक्रमांमध्ये महिलांकडून घालण्यात येणाऱ्या गजऱ्यांमध्ये आता कृत्रिम फुलं पाहायला मिळत आहेत. नैसर्गिक फुलांचे गजरे हे 35 ते 40 रुपये प्रती नग प्रमाणे मिळतात. तर चायनीज फुलं हे त्यापेक्षा दहा रुपयांनी स्वस्त असतात. त्यामुळे हे खरेदीचे प्रमाण वाढले आहे.
नैसर्गिक फुलांच्या किंमती
गुलाब डच : 150 ते 200 रुपये वीस नग
साधा गुलाब : 65 रुपये ते 80 रुपये शेकडा
झेंडू : 40 रुपये किलो
बिजली : 70 रुपये किलो
निशिगंधा : 260 ते 300 रुपये
गलेंडा : 20 रुपये किलो
'औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती भागात गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही फुलांचा व्यवसाय करतो. सध्या नैसर्गिक फुलांपेक्षा चायनीज फुलं खरेदी करण्याचा ट्रेन्ड वाढला आहे. चायनीज फुलांची किंमत कमी असून ते जास्त वेळ टिकतात हे याचं मुख्य कारण आहे,' अशी माहिती फुल विक्रेते मोहम्मद शमी यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Farmer, Local18